अशोक चव्हाणांना ‘हे’ खातं मिळण्याची शक्यता

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र राजकारण

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येऊन जवळपास एक महिना होत आला तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराचा पेच कायम आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल असं शिवसेनेकडून सांगितलं जात होतं. मात्र हा विस्तार नेमका कधी होणार याबाबत अद्यापही ठोस निर्णय झाला नसल्यानं आमदारांच्या मनातही काहीसा संभ्रम आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात काही ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होणार असल्याचं नक्की झालं आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे.

अशोक चव्हाण हे काँग्रेसचे निष्ठावान आणि दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यावरच चव्हाण यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र तेव्हा काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे दोनही माझी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना वेटिंगवर थांबावं लागलं.

मात्र आता मंत्रिमंडळ विस्तारात अशोक चव्हाण यांची वर्णी लागणार हे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अशोक चव्हाण यांनी याआधी राज्याचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. त्यामुळे त्यांना सन्मानजनक खातं देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना ऊर्जा किंवा सार्वजनिक बांधकाम खातं दिलं जाण्याची शक्यता आहे.