दहा रूपयांत शिवभोजन योजना; मुख्यमंत्र्यांची माहिती ; पहिल्या टप्प्यात शिवभोजन योजनेची ५० केंद्रे सुरू करण्यात येणार

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय

गोरगरिब जनतेसाठी लवकरच शिवभोजन योजना सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये जनतेला १० रूपयांमध्ये पोटभर जेवण देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात दिली.

सुरूवातीच्या टप्प्यात शिवभोजन योजनेची ५० केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर राज्यात टप्प्याटप्प्यानं आणखी केंद्रे वाढवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान निरनिराळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफी, समृद्धी महामार्गावरही भाष्य केलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचं थकीत कर्ज माफ करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. मार्च २०२० पासून ही योजना सुरू करण्यात येणार असून सर्व रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच यासाठी कोणत्याही अटीशर्थी ठेवण्यात आल्या नसल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.