राष्ट्रवादी आमच्यासोबत.. गिरीश महाजन यांचे मोठे विधान…शिवसेनेतील काही अस्वस्थ झालेले काही आमदारही आमच्या संपर्कात…

ठळक घडामोडी राजकारण

महाराष्ट्रात मोठी उलथापालथ घडली आहे. राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ‘अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे,’ असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी फुटली, हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र,’संपूर्ण’ राष्ट्रवादी आमच्यासोबत. असे मोठे विधान करून भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. एवढेच नाही तर शिवसेनेतील काही अस्वस्थ झालेले काही आमदारही आमच्या संपर्कात असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीत फूट…

राष्ट्रवादीतला एक मोठा गट फोडून अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिल्याचे आता स्पष्ठ झाले आहे. त्यामुळे काका-पुतण्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीकडून फक्त अजित पवार कुटुंब दिसलं आहे. राष्ट्रवादीचे इतर कोणतेही नेते किंवा स्वत: शरद पवार हे यावेळी कुठेही दिसले नाहीत.

अजित पवारांनी दिली माहिती

महिनाभर नुसतं चर्चेचं गुऱ्हार चालू होतं मात्र त्यामधून कोणताही तोडगा निघत नव्हता. त्यामुळे स्थिर सरकार स्थापन कसं होणार हा प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी जो माझ्यावर विश्वास दाखवून मला जी जबाबदारी दिली आहे ती निश्चितपणे चांगल्यापद्धतीनं पार पाडण्याचा प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

.

‘मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांचं अभिनंदन. मला विश्वास आहे ते महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काम करतील,’ असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात मोठी उलथापालथ

मुंबईतील राजभवनात शनिवारी सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ दिली. महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्री मोठी उलथापालथ झाली.

सत्तासंघर्ष सोडवण्यासाठी महाविकासआघाडीकडून सातत्यानं बैठकांचा सिलसिला सुरू होता. आज चर्चा अंतिम टप्प्यात येणार असल्याची चर्चाही होती. अखेरच्या टप्प्यात सगळं ठरत असताना मात्र अचानक राजकीय भूकंप आला आणि थेट राजभवनात मुख्ममंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. महाविकासआघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार होती मात्र त्याआधीच शनिवारी शपथविधीसोहळा पार पडल्यानं अनेक सवालही उपस्थित होत आहेत. महिन्याभरापासून सुरु असलेला सत्तसंघर्षाचा तिढा अखेर सुटला आणि एक वेगळं समीकरण समोर आलं आहे.

अचानक आलेल्या राजकीय भूकंपामुळे मात्र अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. शिवसेना आणि काँग्रेसला डावलून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी केली का? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली का? अजित पवार महाविकास आघाडीत होत असलेल्या चर्चांबाबत नाराज होते का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.