मुख्यमंत्री सहायता निधी पासून एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहता कामा नये, फडणवीसांची राज्यपालांना विनंती

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण

विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यापासून या कक्षाचे काम रेंगाळले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या सुचनेनंतरही निवडणुकीच्या काळात कक्षाचे काम झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यापासून तर कक्षाचे काम पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. त्यामुळं मदतीच्या अपेक्षेत असलेल्या 5 हजारपेक्षा अधिक रुग्णांचे आयुष्य सध्या अधांतरी असल्याचे दिसून येत आहे.

यावरच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो. या निधीचे संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावे. पण एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, अशी विनंती केली आहे. राज्यपाल महोदयांनी सुद्धा यावर तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

राष्ट्रपती राजवटीचा मोठा फटका आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांना बसला आहे. राष्ट्रपती राजवटीमुळे मंत्रालयातील ७ व्या मजल्यावरील मुख्यमंत्री वैद्यकीय निधी कक्षाला सध्या टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळं ५ हजार ६५७ रुग्णांचा जीव सध्या टांगणीला लागला आहे.

 

मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय निधी कक्षाला टाळे लागल्याने आज हजारो रुग्ण या मदतीपासून वंचित आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय निधी कशातून मदत मिळण्यासाठी राज्यातील काना कोपऱ्यातून या ठिकाणी येत होते. गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या कक्षातून तब्बल २१ लाख रुग्णांना १६०० कोटीहून अधिक निधी मिळाला आहे.