राज्यात लवकरच महाशिवआघाडीचे सरकार बसणार – उद्धव ठाकरे

ठळक घडामोडी राजकारण

राज्यात महाशिव आघाडीचे लवकरच सरकार बसणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. आपण संपूर्ण कर्जमाफी तर देणार आहोतच. पण सध्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत प्रत्येक शेतकऱ्याला मदत देण्याची आमची भूमिका आहे. शेती आणि शेतकरी हा आमच्या सरकारचा केंद्रबिंदू राहिल असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना म्हणाले.

यादरम्यान कडेगाव तालुक्यातील आंबेगाव येथे एका टोमॅटो पिकाची नुकसानी पाहण्यासाठी ठाकरे जात होते. यावेळी ग्रामपंचायत नेवरी येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम आणि आमदार आणि कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी ठाकरे यांच्यासोबत खा. विनायक राऊत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, आमदार विश्वजीत कदम, आमदार अनिलराव बाबर, संपर्कप्रमुख नितिन बानुगडे पाटील, पक्षनेते नीलम गोरे, माजी मंत्री विजय शिवतारे, जिल्हा प्रमुख संजय विभुते बजरंग पाटील आदी उपस्थित होते.