मुखेड भाजपा तालुकाध्यक्ष जाहुरकर यांचा राजीनामा

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

    पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली माहिती

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

भारतीय जनता पार्टीचे मुखेड तालुकाध्यक्ष नामदेव पाटील जाहुरकर यांनी दि. 12 रोजी शासकीय विश्रामगृह मुखेड येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली. यावेळी अपक्ष नगरसेवक विनोद आडेपवार यांची प्रमुख उपस्थित होती.

दरम्यान मागील झालेल्या विधानसभा निवडणूकीत जाहुरकर व आ.डॉ.राठोड यांच्या बेबनाव झाल्याने त्यांचे सुत जुळले नव्हते तर तालुकाध्यक्षांनी सुध्दा त्यांना उघड उघड विरोध दर्शविला होता. शहरात तालुकाध्यक्ष जाहुरकर यांनी भाजपा कार्यालयही सुरु केले होते. आमदार व जाहुरकर यांच्या मागील काळात खटके उडाले असुन भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने व पक्षाची बांधणी करण्यास अडचण अनेकदा जाहुरकर यांनी बोलून सुध्दा दाखविले होते तोच मुद्दा उपस्थित करीत भाजपा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहुरकर यांनी यावेळी सांगितले.
             सदर राजीनामा भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आ.राम पाटील रातोळीकर यांच्याकडे पाठविणार असल्याचे सांगत भविष्यात पक्षाचा कार्यकर्ता म्हणुन काम करणार व पक्ष जी जबाबदारी सोपवील ती प्रामाणिकपणे पार पाडयाचा प्रयत्न करणार असल्याचेही म्हणाले.
तर जाहुरकर हे 1994 पासुन पक्षाचे काम केलेले एकनिष्ठ पदाधिकारी असुन पक्षाच्या पडत्या काळात आंदोलने, मोर्चे व संघटनात्मक बांधणीचे काम तालुकास्तरावर केले असुन तालुका सरचिटणिस, तीन वेळा तालुकाध्यक्ष एक वेळा जिल्हा चिटणिस व एक वेळा जिल्हा उपाध्यक्ष म्हणुन जबाबदा­या पार पाडल्या आहेत.


        कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय निवड प्रक्रियेत आम्हाला डावलण्याचे काम केले तर नपाच्या निवडणूकीतही निष्ठावंतांना न्याय मिळाला नाही तर अनेक बाबतीत वेळोवेळी बाजूला सारण्याचे काम येथील बाहेरुन पक्षात आलेल्या नेत्यांनी केले असुन ही मुस्कटदाबी सहन होत नसल्याची खंत नामदेव पाटील जाहुरकर यांनी व्यक्त केली.