मुखेड पं.स.सभापती विरोधात भाजप-सेनेच्या सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

         मनमानी व  विश्वासात न घेतल्याचा पं.स. सदस्यांचा आरोप

 मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड 
   मुखेड पंचायत समितीमधील कामकाजात सभापती हे सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज करतात  हा आरोप ठेवून भाजपा व शिवसेनाच्या ९ पं.स. सदस्यांनी  दि. ६  नोव्हेंबर रोजी गट विकास अधिकारी कैलास बळवंत यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांना लेखी निवेदन दिले.
      मुखेड पंचायत समितीत  १४  सदस्य असून या भाजपाचे ८ व शिवसेनेचे २ काँग्रेसचे ४ असे एकूण १४ प.स.सदस्यांचे  पक्षीय  बलाबल आहे .दोन वर्षापूर्वी झालेल्या पंचायत समिती निवडणुकीनंतर भाजपाचे ८  व शिवसेनेचे २ असे भाजपा-सेना युतीचे मिळून १० पंचायत समिती सदस्य निवडून आले.
              यात  भाजपाची  एकहाती  सत्ता आल्यामुळे भाजपाचे अशोक पाटील रवीकर यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली . त्यांचा सभापती पदाचा कार्यकाल हा जवळपास दोन महिने शिल्लक असताना भाजप-सेना युतीचे सदस्यांनी ६  नोव्हेंबर रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देऊन मासिक सभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. या मुळे कोरम अपूर्ण झाल्यामुळे मासिक सभा बरखास्त करण्यात आली.
         यावेळी मासिक  सभेस फक्त ३  सदस्य  उपस्थित होते .त्यात सभापती अशोक पाटील राविकर, व्यंकटराव दबडे व पंढरी कांबळे यांची या सभेस उपस्थित होती. तर त्या मासिक सभेस पंचफुलाबाई लक्ष्मण बाराहाळे, हरिबाई जिवनराव  गोंड ,सविता लक्ष्मण पाटील ,केवळबाई मोहन पाटील, माधव तुळशिराम मंदेवाड,राम पाटील चांडोळकर ,अनिता राजाराम येळगे, शकुंतलाबाई काशिनाथ कोटिवाले, प्रज्ञा जैवंत कांबळे या सदस्यांनी  निवेदनावर स्वाक्षऱ्या करुन गटविकास अधिका-यांना दिले.

पक्षविरोधी काम केल्याने बहिष्कार.! 

   तर  भाजपाच्या ७ सदस्यांनी  भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.राम पाटील रातोळीकर,यांना लेखी निवेदन देवून  यात सभापती हे पक्षाशी एकनिष्ठ राहत नसल्याचा ठपका ठेवत पंचायत समितीच्या मासिक सभेवर बहिष्कार टाकत असल्याचे नमूद आहे. यामुळे पुन्हा एकदा पंचायत समितीमध्ये राजकीय खडाजंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.