सरसकट अतिवृष्टीची भरपाई द्या; बँका आणि अधिकाऱ्यांना कडक सूचना आवश्यक – पंकजाताई मुंडे

ठळक घडामोडी राष्ट्रीय

 

मुंबई – बळीराजाच्या तोंडाशी आलेले पिक गेल्याने त्याची नोंद करण्यासाठी सरकार दरबारी चांगलीच धावपळ करावी लागत आहे. अवकाळी झालेल्या पावसाने खरिपाचे तोंडाशी आलेले पिक गेले आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची सूचना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत. लोकांच्या रांगा आणि अस्वस्थता दूर करण्यासाठी त्यांना आश्वस्त करणारे शब्द गरजेचे आहेत असे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. अतिवृष्टीची सरसकट नुकसान भरपाई देणे आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

              ना. पंकजाताई मुंडे यांनी सध्याच्या नैसर्गिक आपत्तामुळे संकटात सापडलेल्या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी बीडच्या जिल्हाधिका-यांना पत्र पाठवून नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शासनास अहवाल सादर करण्यासही सांगितले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनास पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, बीड जिल्हयासह मराठवाड्यातील शेतकरी गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत असतानाच चालू हंगामात गेल्या काही दिवसांपासून सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात आहे. अशा परिस्थितीत त्यांना शासना मार्फत मदत करण्यासाठी आवश्यक पंचनामे करून तसा अहवाल तात्काळ सादर करावा. दरम्यान, त्यांच्या या पत्रानंतर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही सुरू केली आहे.