मुखेडात डेंग्यूसदृश्‍य रुग्णांमध्ये वाढ ; नपाकडून मोहीमशून्य काम , नगरसेवकांनी सोडले जनतेला वाऱ्यावर; ग्रामीण भागातही मोठी समस्या

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
 ज्ञानेश्वर डोईजड
तालुक्यातील  ढगाळ, दमट हवामान आणि पावसाच्या शिडकाव्यामुळे वातावरणात बदल झाला असून  हे वातावरण आरोग्यास बाधक ठरत असल्याने डेंग्यू सदृश्‍य रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरात डेंग्यू सारख्या साथीच्या रोगांचा फैलाव होऊ लागला आहे. त्यातच शहरातील काही भागात डेंग्यूसदृश्‍य रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
                सध्याची परिस्थिती पाहता शहरात डेंग्यूसदृश्‍य रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्‍यता वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. पावसाचे व नाल्याचे पाणी साचल्याने दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे डासांची पैदास वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यासाठी शहरात नगरपालिकेकडून डास, डासांची पैदास, अंडी, डासांच्या आळ्यांची वाढ रोखण्यासाठी प्रतिबंधक फवारणी करण्याचे काम सुरु करण्याची आवश्यकता आहे.
         तर  दूषित पाण्यामुळे ग्रामीण भागात विविध आजारांनी डोके वर काढले आहे लहान मुलांचं होण्यासारखे आजाराचे लक्षण दिसून येत आहेत त्यामुळे अनेक रुग्ण येथील उपजिल्हा रुग्णालयात व शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तर काही रुग्ण उपचारासाठी नांदेड, हैद्राबाद अशा मोठ्या शहराकडे दाखल झालेले आहेत.
            नगर पालिकेकडून याबाबत कोणत्याही योजना केले नसल्याचे दिसून येत असून नगरसेवक सुद्धा याबाबतीत कोणतीच भूमिका न घेता जनतेला वाऱ्यावर सोडलेले दिसत आहे. सध्या निवडणुकीचे वारे असून नगरसेवक जनतेची सेवा करण्याऐवजी कोणत्या कामात मग्न आहेत असा सवाल सुज्ञ नागरीकातून ऐकायला मिळत आहे. एकंदरीत पाहता डेंगूमुळे  नागरिकांत भीतीचे वातावरण पसरलेले दिसून येत आहे.

             फॉगिंग मशीन आरोग्य विभागाकडून मागवली असून दोन ते तीन दिवसात येणार आहे. शहरात फवारणीचे काम चालू तात्काळ करण्यात येईल. निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने थोडावेळ लागत आहे.                                                              एम डी देवरे , मुख्याधिकारी नगर परिषद मुखेड