अयोध्या प्रकरणाचा निकाल 17 ऑक्टोबरपूर्वी लागण्याची शक्यता

ठळक घडामोडी राष्ट्रीय

 

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर देण्याचे संकेत सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. अयोध्या प्रकरणातील सर्व पक्षकारांनी आपला युक्तीवाद 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. तसेच गरज भासल्यास एक तास जास्त सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली आहे.

अयोध्या प्रकरणाची नियमित सुनावणी 6 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. या सुनावणीचा आज 26 वा दिवस आहे. यामध्ये 16 दिवस हिंदू पक्षकारांनी आपली बाजू मांडली आहे. तर मुस्लीम पक्षकारांनी आतापर्यंत 10 दिवस आपली बाजू माडंली आहे.

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई 17 ऑक्टोबरला  निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीआधी अयोध्या खटल्याचा अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे किंबहुना तसा सुप्रीम कोर्टाचा प्रयत्न आहे.

सुप्रीम कोर्टाने सर्व पक्षकारांना त्यांचा युक्तिवाद किती दिवसात पूर्ण होईल? अशी विचारणा केली. त्यावर सुन्नी वक्फ बोर्डाने युक्तिवादासाठी जास्तीत जास्त एक आठवडा लागेल अशी माहिती दिली. त्यानंतर रामललाच्या वतीने युक्तीवाद करणाऱ्या वकिलांनी दोन दिवस लागतील, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व पक्षकारांनी आपली वेळ निश्चित केल्याने, निकालाची सुनावणी लवकरच पूर्ण होऊ शकेल, असं स्पष्ट होऊ लागलं आहे.