विद्युत तारेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू … विद्युत कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 ज्ञानेश्वर डोईजड

            मुखेड :  तालुक्यातील हसनाळ पदे गावातील गंगाबाई पांडुरंग नाईक यांचा खाली पडलेल्या विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 26 रोजी सायंकाळी 4  वाजता घडली.
      सविस्तर वृत्त असे की गंगाबाई पांडुरंग नाईक वय 35 वर्षे राहणार हसनाळ पदे येथील रहिवासी असून
पाणी आणण्यासाठी म्हणून घराच्या बाहेर त्या निघाल्या विजेच्या तारा खाली पडल्या होत्या त्या त्यांना दिसले नसल्यामुळे विद्युत तारेचा शॉक लागून त्या जागीच गतप्राण झाल्या.
        गावातील नागरिकांनी सदर महिलेस उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दाखल केले पण त्या जागीच मृत्यु  झाल्याने त्यांना शवविच्छेदन गृहात स्थलांतर केले . गावातील नागरिकांनी या घटनेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस जबाबदार धरले असून अनेकदा तक्रार करूनही विद्युत तारा बाबत विद्युत कंपनीने कसलीच कारवाई केली नाही यामुळे हा मृत्यू झाला असल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे .
      याबाबत मुखेड पोलिसात महिलेच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विरोधात तक्रार दाखल केली असल्याचे कळते सदर महिलेच्या पश्चात एक लहान मुलगी असून आई-वडील भाऊ,  सासू-सासरे आहेत .

      अपघातात पतीचा मृत्यू मुलगी झाली पोरगी

           मागील दहा वर्षाखाली मयत महिलेच्या पतीचा मृत्यू झाला असून एक लहान मुलगी असल्याने माता-पित्याचे छत्र हरवल्यामुळे आता मुलगी पोरकी झाली असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.


              विद्युत तारा खाली लोंबकळत आहेत त्या तात्काळ दुरुस्त करून नागरिकांना सहकार्य करावे असे वारंवार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मुखेड यांना सांगितले व निवेदने सुद्धा दिली पण याबाबत वीज कंपनीने कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे विद्युत कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे या महिलेचा जीव गेला आहे .
       विलास नाईक
  गावकरी, हसनाळ प दे, मुखेड