गांधींच्या विचारावर चालणे हा देशसेवेचा मार्ग -धनंजय गुडसूरकर 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
 ज्ञानेश्वर डोईजड 
         मुखेड: आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे करणे म्हणजे देशसेवा  आहे हा संदेश  गांधीजींनी  दिला. गांधीजींचा हा  संदेश आपण आचरणात आणला तर त्यातूनही  देशसेवाच घडेल असे प्रतिपादन महात्मा गांधी यात्रेचे समन्वयक ,प्रसिद्ध साहित्यिक धनंजय गुडसूरकर यांनी केले.

 

             नीतीनिकेतन विद्यालय जांब(बुद्रुक )येथे महात्मा गांधी यांच्या  150व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित गांधी विचार यात्रेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद जोगदंड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कँँप्टन सुभाषराव बिरादार ,प्रा.डॉ .ए.डी. गायकवाड ,अतुल जाधव  हे  उपस्थित  होते.

 

                प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन  करण्यात आले. “महात्मा गांधी यांच्या  विचारांचा प्रभाव केवळ आपल्या  देशापुरता मर्यादित नाही, गांधी विचाराला स्थळ, काळ अथवा भौगोलिकतेच्या  मर्यादा नाहीत म्हणून महात्मा गांधी जगातील अनेक क्रांत्यांची प्रेरणा ठरतात.गांधीजींच्या  जगण्याच्या माध्यमातून अनेक देशातील थोर पुरुषांना प्रेरणा मिळाली व यातूनच जगभरातील उपेक्षितांना न्याय मिळाला.

 

                  गांधीजींचे विचार चिरकाल मानवजातीसाठी पूरक आहेत, बदलत्या परिस्थितीत येणाऱ्या प्रश्नांची  उत्तरे गांधीजींनी विसाव्या शतकातच देऊन ठेवली आहेत. आपणाला त्यांची उत्तरे गांधीजींच्या जगण्यात सापडतात. आपण त्याकडे सकारात्मकतेने पाहिले तर अनेक प्रश्न  सहजपणे सुटू शकतील असे मत श्री गुडसूरकर यांनी पुढे बोलताना व्यक्त केले.

                 
              यावेळी बोलताना सुभाषराव बिरादार यांनी महात्मा गांधींच्या आयुष्यातील घटनांना उजाळा देत त्यांच्या  विचारावर चालण्याची गरज प्रतिपादन केली. महात्मा गांधी यांनी केलेले प्रयोग परिणामकारक ठरतात. यावरून त्यांच्या  कार्याची महती आपल्याला कळून येते “असे मत सुभाषराव बिरादार यांनी पुढे बोलताना व्यक्त केले. अध्यक्ष प्रल्हाद जोगदंड यांनी अध्यक्षीय समारोप केला.प्रा.बालाजी नरवाडे यांनी सूत्रसंचालन तर ओंकार सोनटक्के यांनी  आभार मानले.