निवडणूक लढवणार नाही- इंदोरीकर महाराज

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र राजकारण
लोकभारत न्यूज नेटवर्क
ते काम आपलं नाही, ते जमणारही नाही ‘ असे समाजप्रबोधन कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी सांगत राजकारणात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याच्या वृत्ताचा स्पष्ट शब्दात इन्कार केला.
महाजनादेश यात्रेनिमित्त संगमनेर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला इंदुरीकर महाराज उपस्थित होते, त्यामुळे ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार ,संगमनेर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणूक लढविणार अशी चर्चा समाजमाध्यमावर सुरु झाली. त्यासंदर्भात संपर्क साधला असता इंदोरीकर महाराज यांनी या वृत्ताचा इन्कार केला.
पूरग्रस्तांच्या मदतीचा एक लाख रुपयांचा धनादेश देण्यासाठी आपण संगमनेर येथील सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटलो. त्यामागे राजकीय हेतू नव्हता असे ते म्हणाले. ते आपल्याला जमणार नाही, ते कामही आपले नाही. माध्यमातून चुकीचे वृत्त आले .त्यात तथ्य नाही, असेही इंदुरीकर महाराज यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. इंदुरीकर महाराज आमदारकीचं तिकीट घेणार नाहीत. बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणूक लढणार नाहीत. कोल्हापूर—सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून १ लाख रुपये देण्यासाठी महाराज तिथं गेले होते,असं इंदुरीकरांचे सहायक किरण महाराज शेटे यांनी सांगितले.
तर इंदुरीकर महाराजांच्या भाजप प्रवेशाविषयी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितलं,की आमदारकीबाबत आमची कोणतीही चर्चा महाराजांशी झालेली नाही. मुख्यमंत्री सहायता निधीस पैसे देण्यासाठी ते उपस्थित होते. त्या व्यतिरिक्त कुठल्याही स्वरूपाची राजकीय चर्चा आमच्यात झालेली नाही.
इंदोरीकर महाराज व मंत्री विखे यांच्या खुलाशामुळे इंदुरीकर महाराज विरुद्ध बाळासाहेब थोरात असा सामना आता होणार नाही.
भाजप उमेदवाराच्या शोधात?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात भाजपला अद्याप उमेदवार सापडलेला नाही. मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनीताई विखे यांनी निवडणूक लढवावी, अशी चर्चा होती, पण त्यातून पुढे काही निष्पन्न झालं नाही.