आत्महत्या-एक गंभीर समस्या……… – डॉ रामेश्वर मल्लिकार्जुन बोले (मानसोपचारतज्ज्ञ)

नांदेड जिल्हा मुखेड राष्ट्रीय
              रात्रीचे 12.30 वाजले होते माझी 6 महिन्याची मुलगी राजवी खेळून खेळून नुकतीच झोपली होती. मी आणि आम्ही सर्व कुटूंबीय झोपण्याच्या तयारीतच होतो की मोबाईल ची रिंग वाजली. नंबर अनोळखी होता, पण एवढ्या रात्री कॉल आला आहे तर नक्कीच काही अडचण असेल म्हणुन मी तो उचलला, “Hello डॉक्टर साहेब बोलताय का?”
“हो बोला बोलतोय” मी.
“नमस्कार साहेब! मी रेल्वे पोलिस मधून बोलतोय. आमच्या कडे एक व्यक्ति आली आहे अणि त्याचं मानसिक संतुलन बिघडल्या सारखं वाटत आहे. मी आत्ता त्याला तुमच्या कडे घेऊन येऊ का? मला वाटते त्याला आत्ता तुमच्या उपचाराची गरज आहे”
“लगेच घेऊन या” मी सांगितलं.
      45 मिनिटानी ती लोकं त्या व्यक्तीला घेऊन आले. अनिल (रुग्णांचे नाव), एक रेल्वे पोलिस अणि सोबत बारा व्यक्तीचा ताफा. फोन करणारा पोलिस समोर आला. तो मला थोडा ओळखीचा वाटला. काही वर्षांपूर्वी त्याने माझ्याकडून व्यसनमुक्ती साठी उपचार घेतले होते म्हणुनच कदाचित माझा नंबर त्याच्या कडे असावा.
“बरं काय समस्या आहे?” मी विचारलं.
पोलिस म्हणाला “सर हा अनिल, मुदखेड चा राहणारा रात्री 12 वाजता रेल्वेचा वॉचमन रुळाची पाहणी करत असताना हा रेल्वे रुळावर आडवा झोपला होता. 15 मिनिटानी त्या रुळावरून अजंता एक्सप्रेस धावणार होती. वॉचमन च्या बॅटरी चा उजेड डोळ्यावर पडून सुद्धा हा उठत नव्हता. त्यांनी त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्याशी वाद घालत होता आणि म्हणत होता,’सोडा मला, मरू द्या, मला जगायचं नाही’. शेवटी त्यांनी आम्हाला फोन केला अणि त्याला चौकीवर आणले. त्यांच्या घरच्यांना फोन केला अणि नंतर तुम्हाला केला”
       मी अनिल कडे पाहिले. उद्विग्न झालेला अनिल खाली मान घालून बसलेला होता. हताशपणा अणि निराशेचे वादळ त्याच्या भोवती घोंगावताना दिसत होते. जगण्याची उमेद हरवुन बसलेला अनिल उदासीनतेच्या काळोखात पार बुडाला होता. तीन वेळेस आवाज देऊन सुद्धा माझे शब्द त्याच्या कानापर्यंत पोहचले नाही, शेवटी मी माझ्या सहाय्यकाला त्याला स्पेशल रूम मध्ये नेण्यास सागितले. त्याच्या सोबत त्याचा भाऊ, काका अणि शेजारील मंडळी आली होती.
कपिल नावाच्या त्याच्या भावाकडून मी माहिती घेण्यास सुरुवात केली. तो म्हणाला,”सर एक महिन्या पूर्वी पर्यंत सर्व काही ठीक होतं. घर व्यवहार अगदी सुरळीत चालू होता. बायको अणि दोन मुले आहेत त्याला, पण देव जाणे त्याला अचानक काय झाले. एक महिन्या पासून एकटा एकटा राहतो. पुर्वी सारखा बोलत नाही, वहिनी सुद्धा म्हणतात हल्ली ह्यांच  लक्ष नसतं, कुठे तरी हरवलेले असतात. विचारल तर म्हणतात करमत नाही. सकाळी लवकर उठतो, बेचैन असतो. 15 दिवसा पुर्वी वाहिनीला म्हणाला होता की जगावंस वाटत नाही. पण त्यांनी काही मनावर घेतले नाही. काल सकाळी नांदेड ला जातो म्हणुन निघाला अणि इथे येऊन पोहोचला. सर खूप भीती वाटत आहे. 5 वर्षा पुर्वी माझ्या सख्या मोठ्या भावाने फाशी घेऊन  आत्महत्या केली अणि 3 वर्षा पुर्वी माझ्या छोट्या बहिणीने कीटकनाशक पिऊन जीवनयात्रा संपविली. भूतकाळाची पुनरावृत्ती होईल ह्याची भीती वाटते.” भयाण उद्विग्नता स्पष्ट जाणवत होती.
लोक आत्महत्या का करतात? अश्या कोणत्या गोष्टी त्यांच्या सोबत अणि त्यांच्या आयुष्यामध्ये घडतात की ते लोक स्वतःचं आयुष्य संपविण्यासाठी निघतात….. एक महिन्या पूर्वी कर्नाटकाच्या मंत्र्याच्या जावयाने जो की स्वतः मोठा उद्योगपती होता, त्याने कावेरी नदी मध्ये जलसमाधी घेतली. नांदेड मध्ये मागच्याच आठवड्यामध्ये एका राजकीय पक्षाच्या जिल्हा अध्यक्षाने स्वतःला फासावर लटकवले. परवाच वर्तमानपत्रात वाचले, की बीड जिल्हयामध्ये एका शेतकर्‍याने आपल्या दोन मुलीना अणि पत्नीला विषारी औषध देऊन स्वतः फाशी घेतली. खरंच व्यक्ति स्वतः बद्दल अणि इतरांबद्दल एवढा निर्दयी का होतो?….
   सोन्यासारखा संसार असणारा अनिल स्वतः चा जीव घेण्यास का प्रवृत्त होतो?….का भय्युजी महाराजासारखा सामाजिक क्षेत्रात काम करणारा व  संत म्हणवणारा माणुस कंटाळून जाऊन आत्महत्या करतो?…..
जगात दरवर्षी सुमारे दहा लाख लोक आत्महत्या करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, मानवी मृत्यूच्या कारणाच्या क्रमवारीत आत्महत्या तेराव्या क्रमांकावरचे कारण आहे.
    प्रसिद्ध तत्त्वज्ञानी ‘इमाईल दुर्खीम’ ह्यांच्या मते, ‘आत्महत्या ही एक सामाजिक समस्या आहे’. सामाजिक अव्यवस्था (social disorganisation) किंवा सामाजिक एकात्मता व प्रामाणिकपणा (social integrity) अणि सामाजिक समरसता  व त्याची जाणीव (social solidarity) चा अभाव ही मुख्य कारणे आहेत. त्यांच्या मते व्यक्ति अणि समाज ह्यांच्यातील नाते कोणत्या प्रकारचे आहे हे जास्त महत्वाचे आहे. त्याच्या सोबतच व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य अणि मानसिक आजार हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. नैराश्य, छिन्नमनस्कता, व्यसनाधीनता ही महत्वाची कारणे मानली जातात. इतर कारणे म्हणाल तर नातेसंबंधातील कटुता, अर्थिक विवंचना, अति महत्त्वाकांक्षेपोटी निर्माण झालेली स्पर्धा अणि त्यानंतर निर्माण होणारे वैफल्य अणि उदासीनता ईत्यादी….
   …….. … कारणे कोणतीही असोत, या पृथ्वीतलावर जन्माला येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला जगावंस वाटतं. आपलं अस्तित्व सिद्ध करावसं वाटतं, ही एक नैसर्गिक प्रवृत्ती(natural instinct) आहे. काही कारणास्तव त्याला अडचणींचा सामना करावा लागतो. आपले अस्तित्व टिकवण्याचा तो सर्वतोपरी प्रयत्न करतो. तो स्वतःशी अणि इतरांशी लढतो, मदतीची भीक मागतो, आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करतो. जेंव्हा त्याच्या कडील साधनसामुग्री (resources) ती आर्थिक असो, सामाजिक असो किंवा मानसिक (मानसिक धैर्य अणि सकारात्मकता) असो ती संपते आणि जेंव्हा त्याला कोणतीही आशा दिसत नाही तेंव्हा तो आत्महत्येचा मार्ग पत्करतो, तो पर्यंत तो लढत असतो.
     म्हणून, वेळीच व्यक्तीच्या समस्या हाताळल्या तर आत्महत्या काही अंशी आपण रोखू शकतो.
अनिल आमच्या हॉस्पिटल मध्ये 8  दिवस होता. आम्ही त्याला विद्युत उपचार अणि नैराश्य कमी करण्याच्या गोळ्या दिल्या. ठणठणीत बरा होऊन तो घरी गेला.
    आपण एका व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून वाचविले ह्याचे समाधान शब्दात नाही मांडता येणार…
                                                        डॉ रामेश्वर मल्लिकार्जुन बोले (मानसोपचारतज्ज्ञ)