वासुदेव समाजाचे विविध मागण्यासाठी तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड
                 छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात वासुदेव हा समाज प्रबोधन करणारा समाज म्हणून ओळखला जात होता पण सध्या समाजाची दशा झालेली असून हया झालेल्या दशेला चांगली दिशा मिळावी यासाठी वासुदेव समाजाकडे सरकारने लक्ष घालून समाजाच्या विविध मागण्यासाठी तहसिलदार काशिनाथ पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना दि. 07 रोजी वासुदेव समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
               या निवेदनात नांदेड येथे वासुदेव समाजासाठी सांस्कृतिक भवन निर्मितीसाठी 2 कोटी निधी मंजुर करावा, पंढरपुर, औंढा,आळंदी, परळी, औरंगाबाद,चंद्रपुर अशा विविध ठिकाणी सांस्कृतिक भवन निर्माण व्हावे, वासुदेव समाजाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी समाजाला विशेष जातीचा दर्जा दयावा, कलावंताना दरमहा 5 हजार रुपये मानधन दयावे, मोर टोपी सजावटीसाठी 10 हजार रुपये अनुदान दयावे, नॉन क्रिमिलिअर अट रद्द करावी, युवकांना रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी शासकीय भुखंड दयावे, लघु उदयोगांसाठी वासुदेव समाजास वसंतराव नाईक महामंडळात 10 कोटीची तरतुद करावी व शैक्षणिक विभागात सवलती देऊन वासुदेव समाजास न्याय देण्याचे काम करावे अशा विविध मागण्या या निवेदनात नमुद करण्यात आल्या आहेत.
                 वासुदेव समाज हा महाराष्ट्रातील गावा – गावामध्ये सकाळच्या प्रहरी घरोघरी फिरु न पांडुरंगावरील अभंग, गवळणी याप्रकारचे गाणे गात दान मागणारा लोक कलावंत म्हणून परिचित असुन वासुदेव समाजाच्या या लोककलेचे दयनीय अवस्था झालेली असून वासुदेव लोककलाकार यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. सामाजिक सवलतीतही शिक्षण व्यवस्थेत नगण्य संख्या दिसत आहे त्यामुळे या समाजातील युवकांची बेरोजगारांची संख्या सुध्दा जास्त आहे.
               वासुदेव समाजाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात मावळयांच्या घरी निरोप पाठविण्याबाबत त्यांचा उपयोग होत होता. पण सध्या वासुदेव समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून समाजाच्या उन्नतीकडे सरकारने लक्ष देउन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सरकारने करावे अशी मागणी वासुदेव समाजाच्या वतीने करण्यात आली.


            यावेळी वासुदेव समाजाच्या नरगसेविका सौ. संगिता गोविंदराव घोगरे, सौ. सुरेखा घोगरे, गोविंद घोगरे,लालोजीराव वाकोडे, ज्ञानेश्वर डोईजड, शेलार रोडगे, भारत धुर्वे, व्यंकट घोगरे, राजु रोडगे, भगवान रोडगे, दत्ता घोगरे, अशोक धुमाळ, विजय डोईजड, विठठल घोगरे, गणेश घोगरे, रामजी रोडगे, उत्तम वाकोडे, शिवाजी कुंभारकर, प्रदिप रोडगे, श्री धुमाळ, विठठल रोडगे रविकिरण रोडगे, सुरज डोईजड, बालाजी कुंभारकर, यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.