प्रधानमंत्री पीकविमा योजनेस 29 जुलैपर्यंत मुदतवाढ

इतर बातम्या ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढावा 
भागवत देवसरकर यांचे आवाहन
      नांदेड :  प्रतिनिधी
प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम 2019 मध्ये शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याकरिता मागील अनेक दिवसांपासून येणाऱ्या तांत्रिक अडचणी व जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम 2019 मध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 25 जुलै ते 29 जुलैपर्यंत मुदत वाढ दिली आहे. सदरच्या कालावधीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढावा, असे अवाहन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केले आहे.
मागील आठवडाभरापासून शेतकऱ्यांना पीकविमा काढण्यास अनेक अडचणी येत होत्या. सर्वरची अडचण, सातबारा मिळण्यास विलंब व इतर अनेक गोष्टींमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी व संघटनांनी राज्य सरकारकडे विमा भरण्यास तारीख वाढवून मिळावी, यासाठी मागणी केली होती. या सर्व मागण्यांचा विचार करून सरकारने 5 दिवस मुदतवाढ दिली. सध्या जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढून संरक्षण द्यावे, जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. शेतकऱ्यांनी पीकविमा काढतेवेळेस सातबारा, पीकपेरा, बॅंक पासबुक हे घेऊन सेतू सुविधा केंद्रावर जाऊन आजच आपल्या पिकांचा विमा काढून पिकांना संरक्षित करावे, असे आवाहनही शेवटी भागवत देवसरकर यांनी केले.
——————————————————-