मुखेड उपजिल्हा रुग्णालयाचा पंचनामा  आरबीएसके चे १५ पैकी १० कर्मचारी गैरहजर तर कार्यालयीन  ३ कर्मचारी गैरहजर …उपस्थितीती पट पाहायलाही मिळेना !  उपजिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराची लस काही सापडेना ! 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
      सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गेडेवाड व अर्जुन रॅपनवाड यांच्या तक्रारीवरून तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्या आदेशान्वये मंडळ अधिकारी प्रकाश यालावाड व तलाठी बालाजी बोरसुरे यांनी  दि २४ रोजी मुखेड उपजिल्हा रुग्णालयाचा   पंचनामा केला असता  पुन्हा एकदा भोंगळ कारभार समोर आला असून वारंवार  भोंगळ कारभार होत असताना मात्र या भोंगळ कारभाराची लस काही सापडेनाशी झाली आहे.
    उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची हजेरी पट लिहिणारा कर्मचारीच गायब राहातो तर कार्यालयीन ५ कर्मचाऱ्यापैकी २ कर्मचारी उपस्थित होते व  राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत १५ कर्मचाऱ्यापैकी १० कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले.
      मुखेड उपजिल्हा रुग्णालय हे समस्यांचे माहेरघर बनले आहे. मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर करोना संक्रमित रुग्ण वाढत असताना आरोग्य विभाग सतर्क राहायला पाहिजे होता. मात्र अनेक कर्मचारी अशा परिस्थितीतही गैरहजर राहत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गेडेवाड व अर्जुन रॅपनवाड यांनी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या अनुपस्थितीतचा पंचनामा करावा अशी मागणी केली होती.
  पंचनामा करत असताना  हजेरीपट  मिळाले नाही पण यामध्ये मोठा घोळ असल्याचे स्पष्ट दिसत होते तर अधिकाऱ्यांसह सिक्युरिटी गार्ड व
 एकही स्त्रीरोग तज्ञ उपस्थित नसल्याचे दिसून आले वस्तुस्थिती पाहून मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पंचनामा करून तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्याकडे अहवाल सादर केला.
     पंचनामाच्या वेळी तक्रारदार शिवाजी गेडेवाड, अर्जुन रॅपनवाड, नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार, पत्रकार ज्ञानेश्वर डोईजड, पाशा शेख, हरिदास दुधवाड, माधव गायकवाड आदी उपस्थित होते.
मुखेड तालुक्यात १३५ च्यावर कोरोना संक्रमित रुग्ण आढळून येत असताना आरोग्य विभाग एवढा कसा निष्काळजी राहू शकतो असा प्रश्न नागरिकांना पडला असून लोकप्रतिनिधीने याकडे गांभीर्याने पाहावे असे जनतेतुन ऐकायला मिळत आहे.
या अगोदरही सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर डोईजड यांनी मागील वर्षी पंचनामा केला होता यात  ९ वैदयकीय अधिकारी गैरहजर असल्याचे दिसून आले तर याबाबत पालकमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना निदर्शनास आणून ही दिले पण गैरहजर अधिकाऱ्यावर कोणती कार्यवाही झाली हे अद्याप जनतेला कळाले नाही तर दहा दिवसाखली नगरसेवक नासेर पठाण यांनी सुद्धा तक्रार केली होती याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली असता मोठी अनियमितता दिसून आल्याचा अहवाल दिला.
मतदार संघाचे आमदार डॉ तुषार राठोड यांनी याबाबत वेळोवेळी बैठका घेतल्या पण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार काही कमी होईना. यातील अनेकांचे बाहेर रुग्णालये असल्याने मुखेड उपजिल्हा रुग्णालयात   २४ तासांच्या ड्युटी करून बाहेर आपला कारभार राजरोसपणे करीत असतात.