आणि आज मी प्रोफेसर झालो. . .. . . . प्रा. डॉ.रामकृष्ण बदने ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय, वसंतनगर ता.मुखेड जि.नांदेड ९४२३४३७२१५

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

आपल्या विद्यापीठाचे म्हणजेच( स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे )प्रोफेसर( प्राध्यापक) पदी निवड झाल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले. आणि जीवनातील अनेक वर्षाचा भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहिला.तो लेखणीतून व्यक्त करण्याचा मोह आवरला नाही म्हणून हा शब्दप्रपंच.
तसा मी एका खेडेगावात जन्मलेला. ना कोण्ही गावात प्राध्यापक होता ना घरात.घरात तर अशिक्षितपणा चे साम्राज्यच होते.माझ्या आई वडिलांची व आईच्या वडीलांची(आजोबांची) व मामांची तीव्र इच्छा की मी शिकावे. कारण घरातील वडील मुलगा मीच होतो. सातवीपर्यंत गावच्या शाळेत शिक्षण घेतल्यावर पुढील शिक्षणासाठी गावापासून पाच कि.मी. अंतरावर असणाऱ्या किनगाव ता. अहमदपूर जि.लातूर येथे दररोज पायपीट करून आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतले.घरात अठरा विश्व दारिद्र्य. अनंत अडचणी, सर्वांच्या इच्छेनुसार यावर मात करत शिकत राहिलो. वारा, पाऊस,ऊन व भौतिक सुविधांच्या अभावाने न घाबरता शिक्षण सुरू ठेवले. अकरावी लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात पूर्ण केली. बारावी साठी महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथे आलो. शहरात न राहता गावात राहूनच शिक्षण घेण्याचा निश्चय केला.माझे गाव देवकरा ता. अहमदपूर येथून दररोज 20 किमी बस प्रवास करून अहमदपूर येथे येत असे.अहमदपुर येथे बारावीची परीक्षा दिली. त्यात गुणवत्तेत आलो खरा पण शाखा कला असल्यामुळे त्याचा फार फायदा झाला नाही. फायदा एवढाच झाला की बी.ए. चे संपूर्ण शिक्षण चांगल्या गुणांमुळे शासकीय वसतिगृह अहमदपूर येथून करता आले व आई-वडिलांना शिक्षणासाठी जास्तीचा खर्च करण्याची गरज पडली नाही. याच काळात महात्मा गांधी महाविद्यालयात प्रा. डॉ. भूषण कुमार जोरगुलवार सर, (राज्यशास्त्र ) प्रा.मगरे सर (इतिहास) व ज्यांच्यामुळे माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली ते प्रा.कै. श्याम आगळे ( हिंदी) यांच्या अध्यापनाचा प्रभाव पडला. त्यातच कै.श्याम आगळे सरांची हिंदी अध्यापन पद्धती व त्यांचा विद्यार्थ्यां प्रती असलेला जिव्हाळा पाहून निश्चय केला की आपणही भविष्यात सरांसारखेच हिंदी विषयाचे प्राध्यापक व्हायचे. पण त्यावेळी प्रोफेसरला प्राध्यापक म्हणतात हे माहिती नव्हते. नंतर प्रा..कै.श्याम आगळे सरांच्या सल्ल्याने बी.ए.उत्तीर्ण झाल्यावर त्यांचे पत्र घेऊन दयानंद कला महाविद्यालय लातूर येथे प्रा. डॉ. सूर्यनारायण रणसूभे सरांकडे गेलो. गोरगरिबांच्या मुलांना सतत सर्व प्रकारची मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणजे सूर्यनारायण रणसूभे सर होत. त्यांना मी माझ्याकडे आगळे सरांनी दिलेले पत्र दिले.ते पत्र वाचून मला एम.ए. हिंदीला प्रवेश दिला. मी प्रथम वर्षात शिक्षण घेत असतानाच 1990- 91 च्या काळात वरिष्ठ महाविद्यालयात अधिव्याख्याता व्हावयाचे असेल तर नेट-सेट उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याचे सांगितले गेले. यामुळे आपले प्राध्यापक होण्याचे स्वप्न भंगले असे वाटू लागले. त्याच काळात गुरुवर्य प्रा.डॉ.सूर्यनारायण रणसूभे सरांचा सल्ला घेतला, ते म्हणाले होय, नेट-सेट झाल्याशिवाय पर्याय नाही.मग विचार केला की आपण पहीले बी.एड.करावे व नंतर एम.ए. द्वितीय वर्ष करावे. त्याप्रमाणे फॉर्म भरला व पहिल्या यादीत शासकीय अध्यापक महाविद्यालय परभणी येथे बी.एड. साठी नंबर लागला व तेथे एका भाड्याच्या खोलीत राहून बी.एड.चा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर पुन्हा 1992 साली एम.ए.द्वितीय वर्ष पूर्ण केले. दयानंद कला महाविद्यालयाच्या आमच्या प्राध्यापकांच्या विद्वतेमुळे व माझ्या परिश्रमामुळे 1992 ला त्यावेळच्या मराठवाडा विद्यापीठातून सर्वप्रथम (गोल्ड मेडल) येण्याचा बहुमान प्राप्त केला. तसे तर निकालापूर्वीच गुरुवर्य सूर्यनारायण रणसुभे सरांनी नोकरीसाठी दोन महाविद्यालयांना पत्र देऊन मुलाखतीस मला पाठविले होते.त्यात औसा येथील कुमार स्वामी महाविद्यालयात कनिष्ठ विभागात पूर्णवेळ अनुदानित जागेवरची नोकरी होती. तर दुसरीकडे मुखेड येथे ग्रामीण( कला, वाणिज्य व विज्ञान)महाविद्यालय या महाविद्यालयात विनाअनुदानित स्थितीत प्राध्यापकाची एक जागा रिकामी होती. तेंव्हा दोन्ही ठिकाणचे प्राचार्य डॉक्टर सूर्यनारायण रणसुभे सरांचे जवळचे मित्र होते. त्यामुळे त्यांनी दोन्हीकडे ही मला पत्र देऊन पाठवले. औसा महाविद्यालयात मुलाखत व वर्ग अध्यापन करून वापस निघताना प्राचार्यांनी सांगितले की आपला नीकाल लागल्यास कळवा आम्ही आपणास रुजू करून घेवु.नंतर लगेच मी मुखेड येथे ग्रामीण( कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय येथे आलो. इथेही महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य नागोराव कुंभार हे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. रणसुभे सरांचे पत्र त्यांच्या हाती दिले. ते पत्र वाचून त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली व नोकरीस घेण्यात एक अडचण असल्याचे सांगितले. ते म्हणाले की या एका जागेसाठी यापूर्वीच मी एका प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे पण त्याचा एम.ए.द्वितीयचा निकाल येणे बाकी आहे आणि तुमचा ही निकाल येणे बाकी आहे. दोघांपैकी ज्यांना कुणाला बी प्लस मिळेल त्यांना नोकरीवर ठेवू. दुर्दैवाने माझ्या सहकाऱ्यांना बी प्लस मिळाला नाही व मी त्या वर्षी मराठवाडा विद्यापीठातून हिंदी या विषयामध्ये सर्वप्रथम आलो.त्यामुळे माझी नोकरी पक्की झाली. महाविद्यालयात रुजू होऊन काही दिवस लोटले असतील नसतील तेवढ्यात कुमारस्वामी महाविद्यालय औसा येथे मुलाखात दिलेली असल्यामुळे त्यांनी वेळोवेळी त्यांच्या महाविद्यालयात येऊन रुजू होण्यासाठी कळविले परंतु मी काही वसंतनगरचे महाविद्यालय सोडून जाण्यास तयार नव्हतो. तेव्हा कुमार स्वामी महाविद्यालयातून खास एक प्राध्यापक फोर व्हीलर घेऊन मुखेडला आले व म्हणाले,तुम्हाला महाविद्यालयात रुजू होण्यासाठी घेऊन जाण्यासाठी प्राचार्य साहेबांनी पाठवीले आहे.आपण चलावे. मलाही मुखेड येथील विना अनुदानित महाविद्यालयातील नोकरीपेक्षा कनिष्ठ महाविद्यालयातीलच का असेना परंतु औसा येथील नोकरी पूर्ण पगाराची असल्यामुळे तेथे जाणे महत्त्वाचे वाटू लागले.परंतु त्यापूर्वी आपण आपले प्राचार्य नागोराव कुंभार सरांचा सल्ला घ्यावा आणि म्हणून मी त्या औस्याच्या प्राध्यापकाला घेऊन प्राचार्यांच्या भेटीला वसंतनगर येथे गेलो. तेंव्हा नागोराव कुंभार सरांनी सांगितले की मी या विद्यार्थ्याला आपल्या महाविद्यालयात रुजू होण्यासाठी पाठवणार नाही आणि त्यांनी मला समजून सांगितले की वरिष्ठ महाविद्यालयातल्या नोकरीतील समाधान वेगळेच असते. ते समाधान कनिष्ठ महाविद्यालयात मिळेलच असे नाही. येथे आपल्या बौद्धिक उन्नतीला खूप अधिक संधी प्राप्त होते. तेंव्हा आपण भविष्याचा विचार करून येथेच रहावे. सरांचा सल्ला शिरोधार्य मानून मी औस्याला जाणे टाळले व विनाअनुदानित महाविद्यालयात येथेच कार्यरत राहिलो.त्या काळात आमचे प्राचार्य नागोराव कुंभार सर, संस्थाचालक माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड, संस्थेचे सचिव कै.आ. गोविंदराव राठोड हे अनुदानित महाविद्यालया सारखी पगार आम्हाला देत असत. कारण 1992 च्या काळामध्ये वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना ही म्हणावे तसे जास्तीचे वेतन नव्हते आणि म्हणून आमचे मन इथेच रमत गेले. नोकरीवर रुजू होऊन सहा महिन्याच्या नंतर संस्थाचालकांची ओळख प्राचार्यांनी करून दिली तोपर्यंत संस्थाचालकांचा परिचयही नव्हता.मुळात आयुष्यात शिरूर ताजबंद पासून पूर्वेकडे म्हणजेच मुखेड कडे कधी येण्याचा योग आलेला नसल्यामुळे ईकडच्या कुठल्याच माणसांचा परिचय नव्हता. त्यानंतर महाविद्यालयात विविध कार्यक्रमातील सूत्रसंचलन व वेळोवेळी दिलेल्या भाषणांमुळे संस्थाचालकांसी अत्यंत जवळून संपर्क आला. भाषणाची सवय तसी विद्यार्थी दशेपासूनच होती.याच काळामध्ये एक असी घटना घडली ज्या घटनेने माझ्या आयुष्याला एक वेगळेच वळण दिले आणि तेथूनच प्रोफेसर बनण्याच्या प्रक्रियेत आणखीन गती मिळाली असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. तो प्रसंग म्हणजे आमच्या लग्नाचा. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष युवक शिबिर मुखेड तालुक्यातील सावरगाव पी.येथे होते. त्या ठिकाणी मुखेड पंचायत समितीला पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत असणारे डॉ. गोपीनाथ केंद्रे हे या शिबिरात पशुचिकित्सा शिबिराच्या उद्घाटनासाठी आले होते. त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माझ्याकडे होते ते सूत्रसंचलन ऐकून त्यांनी माझ्या लग्नाविषयी चौकशी प्राचार्यांकडे केली. प्राचार्यांनी मी अविवाहित असल्याचे सांगितले आणि मग डॉक्टर साहेबांनी संस्थाचालक व प्राचार्य साहेबांसी संपर्क करुन आम्हास गाठले. संस्थाचालकांनी व प्राचार्यांनी हे स्थळ आणि माणसे चांगली असल्याचे सांगितल्यामुळे मी लग्नास होकार दिला. होकार देताना सगळ्यात महत्त्वाचा विचार हा केला की ज्या संस्थेत आपण काम करतो त्या संस्थाचालकांचे व प्राचार्यांचे जर आपल्या सासऱ्यांचे चांगले संबंध असतील तर आपल्या नोकरीवर भविष्यात कधीच गदा येणार नाही. विवाहा नंतर पुन्हा पुन्हा सेट/ नेट च्या वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. भविष्य अधांतरी वाटत होते. त्यावेळी सासरे व पत्नी दैवशालाचा आग्रह होता की मी सेट परीक्षा द्यावी.याच काळात आम्हास एक कन्यारत्न प्राप्त झाले.खर्च आणखिनच वाढला.परीक्षा फीस व संसार चालवण्याचा खर्च सासरे करु लागले ते व पत्नी म्हणाली तूम्ही फक्त अभ्यास करा.बाकी सगळे आम्ही पाहतो. मग सुरु झाले आमचे पुन्हा एकदा विद्यार्थीदशे सारखे अभ्यासाचे पर्व. सुट्टीच्या दिवशी व दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत मुखेडच्या आजूबाजूच्या शेतांच्या मध्ये झाडाखाली बसून अभ्यास करणे, रात्री पहाटे उठून अभ्यासात लक्ष देणे असा दिनक्रम चालू होता. या काळात सेट च्या दोन परीक्षा दिल्या पण दोन्ही परीक्षांच्या मध्ये अनुत्तीर्ण झालो. तिसरी परीक्षा दिली त्याच काळात परीक्षेचा निकाल येण्यापूर्वी संस्थेला महाराष्ट्र शासनाकडून समाज कल्याण विभागाच्या वतीने देशातील व राज्यातील भटक्या-विमुक्तांच्या विद्यार्थ्यांसाठी पहिले विद्यानिकेतन(पब्लिक स्कूल) मिळाले.संस्थेने या विद्यानिकेतन चा पहिला प्राचार्य म्हणून अतिरिक्त पदभार माझ्याकडे सोपवला. येथे काम करत असताना मनात अनेक वेळेस हा विचार येऊ लागला की आपले एम.ए.बीएड.आहे.व हे पब्लिक स्कूल पाचवी ते बारावी पर्यंत आहे तेंव्हा ईथेच कायमस्वरूपी प्राचार्य म्हणून राहायला काय हरकत आहे?संस्थेचा ही या साठी हीरवा कंदील होताच. असा विचार मनात घोळत असतानाच प्राचार्य पद स्वीकारून एक आठवडाही झाला नसेल तेवढ्यात तीस-या सेट परीक्षेचा निकाल हाती आला व त्यात मी उत्तीर्ण झाल्याचे समजले. मग मात्र निश्चय केला की आता वरिष्ठ महाविद्यालयातील नोकरी सोडायची नाही. संस्थाचालकांच्या सहकार्याने व माझ्या बौध्दीक क्षमतेप्रमाणे या शाळेत अनेक उपक्रम घेऊन शाळेचा नावलौकिक करण्यासाठी अल्पसा प्रयत्न केला. प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार सर,प्रा. डॉ. सूर्यनारायण रणसूभे सर,प्रा.कै.श्याम आगळे सर,सासरे डॉ.गोपीनाथ केंद्रे व सौभाग्यवती यांचा आग्रह होता की मी विद्यावाचस्पती (पीएच.डी) ही पदवी प्राप्त करावी. घराकडे आई-वडील अशिक्षित असल्यामुळे त्यांना या पुढच्या प्रक्रियेविषयी चे तसे कुठलेही ज्ञान नसल्यामुळे ते या कामी कधी आग्रह करत नव्हते परंतु आपला मुलगा नोकरीला लागला आहे याचा आनंद मात्र त्यांना गगनात मावेनासा झालेला होता. प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार सर यांच्या सहकार्याने हिंदी साहित्यातील नामवंत प्राध्यापक डॉ .नरसिंह प्रसाद दुबे सरांकडे मी विद्यावाचस्पति साठी नाव नोंदणी केली व संशोधनाला प्रारंभ केला. अत्यंत स्नेह स्वभावाच्या व विद्वत व्यक्तीच्या सहवासाने ही पदवीही मला प्राप्त करता आली. ही पदवी प्राप्त करत असताना सर्व प्रकारचे सहकार्य व सततचे प्रोत्साहन माझी सौभाग्यवती दैवशाला व माझ्या तोपर्यंत झालेल्या दोन्ही कन्यांनी दिले. माझे सासरे डॉ गोपीनाथ केंद्रे यांनी हि मला म्हणाले होते की बदने सर तुम्ही मनावर घेतल्यानंतर जसी सेट परीक्षा उत्तीर्ण केलात तसे एकदा मला पी-एच.डी ही पदवी देखील मिळवून दाखवाला तर मला मनस्वी आनंद होईल आणि त्यांचा शब्द शिरोधार्य मानून मी हे काम पूर्ण केले.या कामी माझ्या महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य ज्ञानोबा वंजे सरांचे ही खूप मोलाचे सहकार्य लाभले. तदनंतर प्राचार्य वंजे सर सेवानिवृत्त झाल्यानंतर संस्थेने महाविद्यालयाचे प्राचार्य पद स्वीकारण्यासाठी सूचित केले आणि संस्थेच्या विश्वासामुळेच मला 2007 ते 2012 पर्यंत माझ्याच महाविद्यालयाची प्राचार्य पदाची धुरा सांभाळण्याची संधी प्राप्त झाली. या काळातही माझ्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे महाविद्यालयात प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला परंतु प्राचार्यपदी माझे मन काही रमत नसल्यामुळे पाच वर्षानंतर पुन्हा एकदा मूळ पदावर सहयोगी प्राध्यापक (असोसिएट प्रोफेसर) म्हणून रुजू झालो आणि तेंव्हापासूनच पत्नीने मला प्रोफेसर या नावाने संबोधायला प्रारंभ केला व तीने इच्छा व्यक्त केली की मला आपणास आता प्रोफेसर पदी पहावयाचे आहे. तेव्हापासून तिने फोन वरती प्रोफेसर हेच नाव फिड केले व दिवसभर मला जेंव्हा जेंव्हा बोलावण्याची वेळ येई तेंव्हा तेंव्हा ती मला प्रोफेसर या नावानेच संबोधित असे. तिची इच्छा पूर्ण करण्याची खूप इच्छा असूनही सहाव्या वेतन आयोगा मध्ये काही मोजक्या लोकांनाच प्रोफेसर होण्याची संधी प्राप्त होणार असल्यामुळे ती संधी काही त्या कालावधीमध्ये मला प्राप्त होऊ शकली नाही. परंतु सातव्या वेतन आयोगा मध्ये महाविद्यालयातील विद्यापीठ अनुदान आयोगाने घालून दिलेल्या नियमावलीत बसणाऱ्या प्रत्येक सहयोगी प्राध्यापकास प्राध्यापक (प्रोफेसर )होण्याची संधी दिली जाणार असल्याचे कळाले व जोरात कामाला लागलो आणि वर्तमान प्राचार्य डॉ.हरिदास राठोड सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रतिनिधी,उच्च शिक्षण सहसंचालक ,संस्था प्रतिनिधी,विषयतज्ञ, विभागप्रमुख या प्रतिनिधींच्या उपस्थितीत दिनांक 9 ऑक्टोबर 2020 रोजी प्रोफेसर या पदासाठीच्या समिती समोर गेलो व 02 डिसेंबर 2020 रोजी प्रोफेसर झाल्याचे विद्यापीठाचे पत्र प्राप्त झाले आणि वरील सर्व मान्यवरांनी केलेल्या सहकार्यामुळे व प्रोत्साहनामुळेच मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. हा भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहिला तो शब्दबद्ध करण्याचा मोह आवरला नाही म्हणून हा शब्द विस्तार आपल्यासमोर मांडला. मी प्रोफेसर झालो म्हणजे जगावेगळे आणि जगात फार मोठे काहीतरी प्राप्त केले असे मुळीच नाही किंवा या गोष्टीचा अहंकार म्हणूनही मी हे लेखन केले नाही तर माणूस जीवनामध्ये जो घडतो त्याला घडविण्यासाठी चांगल्या माणसांचे सहकार्य व प्रोत्साहन मिळत गेले तर निश्चितपणे तो आपल्या आयुष्यातील उद्दिष्टे साध्य करू शकतो हे यातून मला रेखांकित करायचे आहे. माझ्या आयुष्यात मला इथपर्यंत पोहोचवन्या मध्ये जसे माझे आई वडील,आजोबा, मामा मामी यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले आहे तसेच नोकरीनंतर माझे सासरे आणि माझी सौभाग्यवती व माझ्या दोन कन्या यांचे ही मोलाचे सहकार्य लाभले. घरात सौख्य,शांतता असेल तरच माणूस आयुष्यामध्ये आपले ध्येय प्राप्त करू शकतो हे मी अनुभवले.माझ्या सौभाग्यवतीने मला हे पद प्राप्त करण्यासाठी दिलेल्या सततच्या सहकार्याबद्दल वरील सर्व मान्यवरांच्या बद्दल कृतज्ञताभाव व्यक्त करून मी इथेच लेखणीला पूर्णविराम देतो.

प्रा. डॉ.रामकृष्ण बदने
ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान)
महाविद्यालय, वसंतनगर ता.मुखेड
जि.नांदेड
९४२३४३७२१५