शासन निर्णय लागू होण्यापूर्वी संविधान दिन साजरा करणारे एकमेवाद्वितीय महाविद्यालय – प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय हे तालुक्यातील अतिशय जुने महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाचे योगदान हे अनन्यसाधारण आहे. भारतीय संविधानाचे काटेकोरपणे पालन करुन ” संविधान दिन ” साजरा केले जात आहे. जे महाविद्यालय शासन निर्णय लागू होण्यापूर्वीच सामुहिकपणे संविधान वाचन व दिन साजरा करणारे एकमेवाद्वितीय महाविद्यालय असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे यांनी प्रतिपादित केले.

भारतीय संविधान दिन साजरा करणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे तर प्रमुख व्याख्याते राज्यशास्त्र विभागाचे प्रा.हणमंत पाटील आणि व्यासपीठावर प्रा.चंद्रकांत साखरे , प्रा.डॉ. मधुकर राऊत , प्रा.डॉ. आशा गित्ते , कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य के.बालाराजू , अधिक्षक सखाराम सूर्यवंशी हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. विजय वारकड तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे नरंगलकर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन सास्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून करण्यात आले होते. संविधानाचे वाचन प्रा.डॉ. किर्तीरत्न हातोडे यांनी केले. व्याख्याते प्रा.पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून भारतीय संविधान हे सर्वांना समान न्याय , हक्क ,अधिकार , मूलभूत कर्तव्य , समता , स्वातंत्र्य , बंधुता मिळवून देणारी संजीवनी आहे. संविधानाचे महत्व , उद्दिष्ट आणि भारताच्या स्वातंत्र्यापासून आपण काय साध्य केले ? या गोष्टीचा उहापोह यावेळी करण्यात आले.

योगायोगाने महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा 52 वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात शाल , श्रीफळ , हार , पेढे भरवुन सर्व विभागप्रमुख , प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिष्टचिंतन केले. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या शुभेच्छा वर्षावाने भारावून जात भविष्यात असेच कौटुंबिक जिव्हाळा अबाधित राहण्याविषयी आशावाद व्यक्त केले. भारतीय संविधानाची मूल्य, तत्वे यांचा अंगिकार आपल्या जिवनात करण्याविषयी विचार मांडले. याप्रसंगी बहुसंख्येने प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.