मुखेडमधील अतिवृष्टीचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी – शिवशंकर पाटील कलंबरकर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : मोठ्याप्रमाणात झालेली अतिवृष्टी,विजामुळे दि.15 सप्टेंबरच्या मध्यरात्री मुखेड तालुक्यात मोठी जीवितहानी व पिकांचे नुकसान झाले आहे.मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद-बाऱ्हाळी सर्कला याचा मोठा फटका बसला आहे.विजामुळे जीवितहानी,अतिवृष्टीमुळे पिकांचे व घराचे नुकसान,तलाव फुटून पिके व शेती वाहून गेली.या संवेदनशील बाबीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून,याची संबंधितांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केली आहे.

मध्यरात्री झालेला मोठा पाऊस आणि विजांचा कडकडाटामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.मौ.इटग्याळ प.मु. येथील उमाकांत वाघोजी कोठारे या शेतकऱ्यांची 1 लाख 20 हजार रुपयांच्या बैलजोडीकही वीज पडून जीवितहानी झाली.मौ.हाळणी येथील मारोती कोंडीबा खतगावे यांची 60 हजार रुपयांची म्हैस वीज पडून मृत पावली.मौ. कलंबर येथील बालाजी बापूराव खंडेकर या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्यावर वीज पडून संपूर्ण गोठा जळून हाक झाला.मौ.बेन्नाळ येथील पाझर तलाव फुटून शेतकऱ्यांच्या शेतीमधील पिके वाहून गेली.
महसूल विभागाने या सर्व बाबीसंबंधी तात्काळ बैठक घेऊन,संबंधित विभागांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत व झालेल्या नुकसानीची माहिती सरकारला कळवून,शेतकऱ्यांना या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी,अशी मागणी शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केली आहे