यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी खेळ अतिशय महत्वाचे आहे – प्राचार्य डॉ. वसंत भोसले

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : संदीप पिल्लेवाड

येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील क्रीडा विभाग , जिल्हा क्रीडा विभाग , नांदेड व फिट इंडिया मुव्हमेंट अभियानांतर्गत एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महिला महाविद्यालय , परभणी येथील प्राचार्य डॉ. वसंत भोसले यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये खेळाचे महत्व व्यक्त करीत असताना यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी खेळ आतिशय महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेडच्या कॉमर्स अँड मॅनेजमेंट सायन्सचे अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. वसंत भोसले , उद्घाटक इंडियन ऑलिंपिक खेळाडू आणि मेजर ध्यानचंद पुरस्कार विजेता विरेंद्र सिंग , व्याख्याता पीपल्स महाविद्यालय , नांदेडचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. जुझारसिंघ शिलेदार , प्रमुख पाहुणे व्यवस्थापन परिषद अधिसभा सदस्य प्रा. डॉ. दीपक बच्चेवार , जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिने , आयोजक व क्रीडा संचालक प्रा. डॉ.जयदीप कहाळेकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभागातील प्रा. डॉ. चंद्रकांत एकलारे तर आभार प्रदर्शन इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रसाद जोशी यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. प्रास्ताविक आयोजक प्रा. डॉ. जयदीप कहाळेकर तर संस्था तसेच महाविद्यालयाकडून शुभेच्छा आणि महाविद्यालयाचा परिचय प्राचार्य डॉ. एस. बी. अडकिने यांनी दिले. उद्घाटक विरेंद्र सिंग यांना इंटरनेटच्या अडचणीमुळे या राष्ट्रीय परिषदेत सहभागी होणे शक्य झाले नाही. परंतु त्यांचा परिचय करून देणारे राष्ट्रीय स्तरावरील हॉकी खेळाडू डॉ. भीमसिंग मुनीम यांनी त्यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकून त्यांचे संदेश पोहचवले. प्रमुख पाहुणे डॉ. दीपक बच्चेवार यांनी प्राचार्यांचे व आयोजकांचे विशेष अभिनंदन केले. भविष्यात होणाऱ्या उपक्रमासाठी सर्वतोपरीने सहकार्य करून स्वतः सहभागी होण्याचे आश्वासन यावेळी दिले. व्याख्यात्याला अधिक वेळ उपलब्ध करून देण्यासाठी अध्यक्षीय समारोप अगोदर करण्यात आले. त्याप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत भोसले यांनी 21 व्या शतकाच्या बदलणाऱ्या जीवनशैलीवर चिंता व्यक्त केले. या देशाला निरोगी राष्ट्र बनवण्यासाठी युवकांनी तंदुरुस्त राहिले पाहिजे. यशाची उंची गाठण्यासाठी मनाबरोबरच शरीराची साथ सुद्धा आवश्यक आहे. नियमित व्यायाम, आहार , खेळ , जीवनशैली याकडे सातत्याने लक्ष देणे गरजेचे आहे. खेळाच्या सुवर्णयुगात प्रत्येक जण सहभागी व्हावे. येणाऱ्या काळात खेळ माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य अंग निश्चितच बनेल यात काही शंका नाही असे मत प्रतिपादित केले. व्याख्याते डॉ. शिलेदार यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. हॉकी हा भारत देशाचा राष्ट्रीय खेळ असून या खेळाविषयी समाजात व राजकीय क्षेत्रात उदासीनता असल्याचे यावेळी बोलून दाखवले. क्रीडा क्षेत्रात हॉकी देशासाठी गौरव आणि अभिमानाची गोष्ट आहे. खेळाडूकडे खिलाडूवृत्ती , महानता , त्याग , परोपकार , सामंजस्य आणि देशाचा चांगला नागरिक होण्याची पात्रता असावी लागते. व्यायाम आणि खेळ जीवनाचा अविभाज्य अंग बनले पाहिजे. मनोरंजनाबरोबरच शारीरिक , मानसिक सुदृढतेसाठी खेळ अतिशय महत्वाचे आहे. खेळ हे कला आणि शास्त्र आहे. जागतिकीकरणाच्या युगात खेळाला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे अशी भावना या प्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विविध राज्यातील क्रीडाप्रेमी सहभागी होते.