मुलीला वडिलांच्या संपत्तीत समान वाटा, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय

नवी दिल्ली : आता मुलीलाही वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात आज ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यामुळे वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणे मुलीलाही वाटा मिळावा या मुद्द्यावरील वादावर आता पडदा पडला आहे. मुली कायमच प्रेमळ राहतात. परंतु मुलं लग्नापर्यंतच प्रेमळ असतात, अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने हा निकाल देताना केली.

 

आपल्या पित्याच्या मालमत्तेत हिंदू स्त्रियांना भावाप्रमाणे समान वाटा मिळेल, असं 2005 च्या कायद्यात नमूद केलं होते. त्यानुसार, मुलगा आणि मुलगी दोघांनाही त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क मिळतील. परंतु, 2005 पूर्वी वडिलांचं निधन झालं असेल त्यांना या कायद्याचा लाभ मिळेल की नाही हे स्पष्ट नव्हतं. आज न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा कायदा प्रत्येक परिस्थितीत लागू होईल असा निर्णय दिला आहे. यानुसार वडिलांच्या संपत्तीचं वाटप होत असताना वडील हयात असतील किंवा निधन झाले असेल तरीही मुलीला मुलाप्रमाणेच समान वाटा मिळाला पाहिजे, असं खंडपीठाने स्पष्ट केलं आहे.

 

आधीचा नियम काय?
हिंदू सक्सेशन अॅक्ट, 1956 मध्ये 2005 साली दुरुस्ती करुन वडिलांच्या संपत्ती समान वाटा मिळण्याचा अधिकार मिळाला. यानुसार मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीवर तेव्हाच दावा करता येईल, जेव्हा वडील 9 सप्टेंबर 2005 पर्यंत हयात असतील. जर वडिलांचा मृत्यू या तारखेच्या आधी झाला असेल तर मुलीचा वडिलांच्या संपत्तीवर कोणताही अधिकार नसेल. परंतु आता सुप्रीम कोर्टाने ही तरतूद बदलून म्हटलं की संपत्तीमधील वाट्यासाठी वडिलांच्या निधनाचा कोणताही संबंध नाही. म्हणजेच आता हा मुद्दा कायमचा वगळला असून मुली हक्काने वडिलांच्या संपत्तीत आता आपला वाटा मागू शकता.