अटी व शर्तीच्या अधीन राहून हॉटेल, अतिथीगृह, लॉज चालू ठेवण्यास परवानगी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र

नांदेड दि. 8 :- नांदेड जिल्‍हयातील हॉटेल,‍ अतिथीगृह व लॉज चालू ठेवण्‍यासाठी आदेशात नमूदअटी व शर्तीचे अधीन राहून बुधवार 8 जुलै 2020 पासून पुढील आदेशापर्यंत सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्‍यास परवानगी देण्‍यात आली आहे. राज्य शासनाचे आदेश 6 जुलै 2020 नुसारहॉटेल, अतिथीगृह व लॉज चालू ठेवण्‍यासाठी अटी व शर्तीचे अधीन राहून परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यासाठी हा आदेश निर्गमीत केला आहे.

या आदेशात नमुद संपुर्ण निर्देशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही याबाबी तपासून आवश्‍यक कायदेशीर व दंडात्‍मक कारवाई करण्‍यास खालील यंत्रणेस प्राधिकृत करण्‍यात आले आहे. महानगरपालिका हद्दीत महानगरपालिका व पोलीस विभागांची संयुक्‍त पथके गठीत केली आहेत. नगरपालिका हद्दीत नगरपालिका व पोलीस विभागांनी संयुक्‍त पथके गठीत केली आहेत. गावपातळीवर ग्रामपंचायत व पोलीस विभागाचे संयुक्‍त पथक गठीत करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.

वरीलप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा इंसिडंट कमांडर (Incident Commander) यांचेकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा इंसिडंट कमांडर (Incident Commander) यांच्यावर वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी असेल.

या आदेशात म्हटले आहे की, कोरोना विषाणू कोविड-19 बाबत मार्गदर्शक सूचना व त्यासंबधाने घ्यावयाची खबरदारी याची माहिती दर्शविणारे पोस्टर, फलक, दृकश्राव्य, ध्‍वनीफित इ. विशेषत्‍वाने दर्शनी भागी उभारण्यात यावीत. हॉटेलमधील तसेच हॉटेलच्या इमारती बाहेरील ठिकाणी जसे की पार्किगचे ठिकाण या जागी लोकांचे जमावाचे योग्य प्रकारे नियोजन करावे.

तसेच सामाजिक अंतर राखण्याचे दृष्टिकोनातुन रांगाची आखणी करुन बसण्याच्या व्यवस्थेबाबतही पुनर्नियोजन करावे. प्रवेशद्वारावर अनिवार्यपणे तापमान गणना केली जावी. तसेच स्वागत कक्ष टेबल इत्‍यादींना संरक्षक काचा बसविण्यात याव्यात. प्रवेशद्वारावर, अतिथीगृहामध्‍ये आणि व्‍हरांडा (लॉबी) या सर्व ठिकाणी सहजतेणे उपलब्‍ध होतील असे पायाने कार्यान्वित होणारे हॅन्‍ड सॅनिटायझर्सची व्यवस्था करण्‍यात यावी. योग्य प्रकारचे वैयक्तिक सुरक्षेची साधने जसे मास्क ग्लोव्हज इ. हॉटेल प्राधिकरणाने त्यांचे कर्मचारी व ग्राहकांना पुरवावेत.

हॉटेल व्‍यवस्‍थापनांनी ऑनलाईन पेमेंटचा वापर करणे अनिवार्य आहे जसे की ई वालेट, डिजिटल पेमेंट, क्यु.आर.कोड अशा ऑनलाईन संसाधनांचा वापर करावा जेणेकरून ग्राहकाशी प्रत्‍यक्ष संपर्क होणार नाही. लिफ्टमध्ये नागरिकांची संख्या मर्यादित ठेवावी जेणेकरुन सामाजिक अंतराचे नियम पाळले जावेत. वातानुकूलित यंत्र व व्हेंटिलेटरचा वापर करताना CPWD च्या नियमांवलीचे पालन व्हावे. सदर यंत्रांचे तापमान 24-30डीग्री दरम्‍यान असावे आर्द्रता 40-70 डिग्री दरम्यान असावी जेणेकरुन शुद्ध हवा श्वसनास पुरेशा प्रमाणात उपलब्ध असावी.

कोरोना विषाणू-कोविड 19सदृष्‍य लक्षणे नसलेल्‍या ग्राहकांनाच हॉटेल, अतिथीगृह, लॉजमध्‍ये प्रवेश द्यावा. चेहऱ्यावर आवरण असणारे, मास्‍क परिधान केलेले ग्राहक यांनाच हॉटेल, अतिथीगृह, लॉजमध्‍ये प्रवेश द्यावा. तसेच सदर ठिकाणी मास्‍क सतत परिधान करणे आवश्‍यक आहे. ग्राहकांनी आपला सर्व तपशील जसे, प्रवासाचा इतिहास वैद्यकिय स्थिती,ओळखपत्रासह स्वयंघोषणापत्र इ.बाबी. स्‍वागतकक्षात देण्‍यात याव्‍यात. ग्राहकांनी आरोग्‍य सेतू अॅपचा वापर करणे अनिवार्य राहील. ग्राहकांना (House Keeping) हाऊस किपींग सेवेचा किमान वापर करण्‍यास प्रोत्‍साहित करावे.

हॉटेल, अतिथीगृह, लॉजमध्‍ये मार्गदर्शक तत्‍वाचे पालन काटकोरपणे करण्‍यात यावे. हॉटेल, अतिथीगृह, लॉज व्‍यवस्‍थापनाने बैठक व्‍यवस्‍थेची पुर्नरचना करावी. एकवेळा वापर करावयाचे (Disposable) साहित्‍य इ. वापरास प्रोत्‍साहन देण्‍यात यावे. जसे पेपर नॅपकिन इत्‍यादी. हॉटेल, अतिथीगृह,लॉजमध्‍ये जेवणाबाबतींत रुम सेवा व पार्सल सेवा द्यावी. हॉटेल, अतिथीगृह,लॉज हे प्रामुख्‍याने निवासी ग्राहकांना उपलब्‍ध असावेत. हॉटेल, अतिथीगृह, लॉज या ठिकाणी क्रिडादालने, जिम, मुलांसाठी असणारे खेळाची ठिकाणे जलतरण तलाव बंद ठेवण्यात यावे. मोठा जमाव हा काटकोरपणे निर्बंधित असावा, बैठकीचे दालन हे 33 टक्के क्षमतेने कार्यान्वित असावे व बैठकीत एका वेळेस 15 लोकांनाच प्रवेश असावा. ग्राहकांनी रुम रिकामी केल्यानंतर सर्व रुमचे निर्जंतुकीकरण व स्वच्छता करावी.

सदर रुम पुढील 24 तासाकरिता रिकामी ठेवण्यात यावी व इतर कोणालाही त्‍यामध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. रुम रिकामी झाल्यानंतर तेथील टॉवेल व इतर कपडे बदलण्यात यावेत. हॉटेल, अतिथीगृह, लॉज या ठिकाणी वारंवार व परिणामकारक स्वच्छता करण्यात यावी विशेषता प्रसाधनगृह, हात धुण्याची जागा व पिण्याचे पाण्याचे ठिकाण इत्यादी. वारंवार संपर्कात येणारे लिफ्टचे बटन, दाराचे हॅन्‍डल, कडी, बेंचेस इत्यादीचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. याकरिता 1 टक्के सोडिअम हायपोक्लोराइटचा वापर करावा.

नियमित कालांतराने प्रसाधनगृहांची पूर्णत: स्वच्छता करण्यात यावी. अतिथी, ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांचे वापरलेले मास्क हातमोजे इत्यादीची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी. इमारतीत जर एखादा संशयीत किंवा पुष्टी झालेला आजारी व्‍यक्‍ती, रुग्ण आढळला तर त्‍यास इतरांच्‍या संपर्कापासून अलिप्‍त ठेवण्‍यात यावे. नजिकच्‍या आरोग्‍य यंत्रणेस त्‍याबाबत अवगत करावे किंवा जिल्‍हा हेल्‍पलाईन क्रमांकावर संपर्क करावा. अशा प्रकरणी नियुक्‍त केलेल्‍या सार्वजनिक आरोग्‍य प्राधिकरणाद्वारे जोखमीचे मुल्‍यांकन करुन प्रकरणात त्‍यानुसार पुढील कार्यवाही करावी. जर एखादी व्‍यक्‍ती संक्रमित झाल्‍याची पुष्टि झाल्‍यास सर्व इमारतीचे निर्जतुकीकरण करण्‍यात यावे.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व कारवाई करण्‍यात येईल. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना सद्हेतुने केलेल्‍या कृत्‍यासाठी कुठल्‍याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुद्ध कुठल्‍याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. हा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 7 जुलै 2020 रोजी निर्गमित केला आहे.