लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील मुक्रमाबाद येथील संपादीत १ हजार ३१० घरांच्या  मावेजाचा  प्रश्न अखेर मार्गी ; पालकमंत्री  अशोकराव  चव्हाण  यांच्या  पाठपुराव्याला यश …गेल्या ३५ वर्षापासून रेंगाळला होता प्रश्न …

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

पालकमंत्री  अशोकराव  चव्हाण  यांच्या  हस्ते  लाभार्थ्यांना  चेक  वाटप   

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
महाराष्ट्र – कर्नाटक व तेलंगणा सीमेवर  असलेल्या लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील मुक्रमाबाद येथील संपादीत असलेल्या १ हजार ३१० घरांच्या  मावेजाचा  प्रश्न अखेर  मार्गी लागला  असून  पालकमंत्री  अशोकराव  चव्हाण  यांच्या  हस्ते दि ०६ रोजी  जिल्हाधिकारी  कार्यालय येथे  लाभार्थ्यांना  चेक  वाटप   करण्यात  आले .
              प्रातिनिधीक  स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रकल्पग्रस्तांना पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव  चव्हाण यांच्या हस्ते  चेक देण्यात  आला यावेळी  आमदार तुषार राठोड,जिल्हाधिकारी विपीन इटनकर,दिलीप पाटील बेटमोगरेकर,भाऊसाहेब पाटील मंडलापुरकर,सरपंच शिवराज आवडके,सुरेश पंदिलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
        मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथे गेल्या ३५ वर्षापासून महाराष्ट्र व तेलगांणा या दोन राज्याच्या संयुक्तपणे लेंडी धरण होऊ घातले आहे. धरण पुर्णत्वाकडे आले असतानाही शासनाच्या नाकर्तेपणामुळे गेल्या ८ वर्षापासून धरणाचे काम बंद आहे.धरणाच्या बुडीत क्षेत्रात १९ गावातील जमीनी व घरे संपादीत झाले असून यापुर्वीच शासनाने जमीनीला तुटपुंजा मावेजा देऊन धरणग्रस्तांची बोळवन करण्यात आली होती.
बाजार भावा प्रमाणे वाढीव मावेजा मिळावा म्हणून यासाठी धरणग्रस्ताकडून वेळोवेळी धरण कामास विरोध होत आहे.बारा गावा पैकी आकरा गावातील धरणग्रस्तांना  यापुर्वीच घरांचा मावेजा देण्यात आला होता.पण लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील मुक्रमाबाद येथील संपादीत १ हजार ३१० घरांचा  अंतीम निवाडा २०१५ मध्ये पास होऊन देखील आजतागायत घरांचा मिळाला नव्हता. मावेजा मिळावा म्हणून मुक्रमाबाद वासीयांना अनेकदा रास्तारोको,अमरण उपोषणे,बेमुद्दत बाजारापेठ बंद अशा आंदोलनाच्या माध्यमातून मोठा संघर्ष करुण देखील लोकप्रतिनीधी,प्रशासनाकडून आश्वासन खेरीज कांहीच मिळाले नाही.
धरणग्रस्तांच्या पाठपुराव्यामुळे नांदेडचे  पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी हा मुद्दा लावून धरल्यामुळे मुक्रमाबाद येथील संपादीत घरांचा मावेजाचा प्रश्न मार्गी लागल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अशोकराव  चव्हाण यांच्या हस्ते धरणग्रस्तांना मावेजाचा अंतीम चेक देण्यात आला.
           लवकरच मुक्रमाबाद येथे कँम्प घेऊन बाकीच्या धरणग्रस्तांना मावेजाची रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती लक्ष्मण टेकाळे,तलाठी ज्ञानेश्वर रातोळीकर यांनी दिली.मावेजाचा प्रश्न निकाली लागल्यामुळे धरणग्रस्तांनी पालकमंत्री अशोक चव्हाण व प्रशासनाचे आभार मानले आहेत.