तब्बल 92 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रक्तदान करीत दिला कृतितून संदेश “डॉक्टर्स डे” निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबीर

नांदेड नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड दि. 1 :- आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी जसे वातावरण असते अगदी तशीच आजची सकाळ. एकादशीच्या पूर्वसंध्येला जिल्हाभर पेरणीयोग्य समाधानकारक पाऊस झाल्याने प्रशासनाला तसा मोठा दिलासा. त्यात पुन्हा आज कृषि दिन असल्यामुळे सगळ्यांना स्वाभाविकच वेगळा आनंद. या दिनविशेषात आज आणखी एक दिनविशेष ; तो म्हणजे डॉक्टर्स डे ! या सर्व पार्श्वभुमीवर आज सुट्टी असतांनाही जिल्हा प्रशासनाचे मुख्यालय अर्थात जिल्हाधिकारी कार्यालय एका नव्या उत्साहाने उपक्रमात उजळून निघाले. कोरोना पासून सुरक्षिततेच्या व्यवस्थापनामुळे मागील 4 महिने जी एकसंघ धावपळ आणि आयत्यावेळेवरच्या विविध प्रश्नांवर मात करण्यासाठी सज्ज झालेल्या टिमने आज एक नवा पायंडा पाडला.
कोरोनाच्या नाजूक परिस्थितीत गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त मिळण्यात अडचणी येत आहेत, ही बाब एमबीबीएस असलेल्या डॉक्टर विपीन इटनकर यांच्या नजरेतून सुटली नाही. कृतीविना नुसते आवाहन करणे त्यांच्या मनाला पटले नाही. जिल्हा प्रशासनाकडून समाजाला एक कृतीतून संदेश गेला पाहिजे याचे नियोजन त्यांनी आखले. आजचा आषाढी एकादशीचा आणि कृषि दिनाचे औचित्य साधत त्यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातच रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

योगा-योगाने जिल्हा प्रशासनात आजच्या घडिला तब्बल 7 डॉक्टर्स महसूल सेवेत असल्याने त्यांना लागलीच जिल्हाधिकारी यांच्या भावनेतील मर्म पटले. अवघ्या 12 तासात रक्तदान शिबिराचे आयोजन झाले. आज आषाढी एकादशीची शासकिय सुट्टी असतांनाही जिल्हाधिकारी कार्यालय एका वेगळ्या कर्तव्यपूर्तीच्या भावनेने गजबजले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्यासह महसूल मधील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपला अमुल्य सहभाग घेत तब्बल 92 रक्ताच्या बॅग रक्तपेढीकडे सुपूर्द केल्या.