दैनिक उद्याचा मराठवाडाची ‘फ्रंटलाईन वॉरियर्स’ पुरवणी मनोबल वाढविणारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड दि  1 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘डॉक्टर्स डे’ निमित्त दैनिक उद्याचा मराठवाडाने प्रकाशित केलेली ‘फ्रंटलाईन वॉरियर्स’ ही पुरवणी कोरोनासाठी झगडणाऱ्या समस्त डॉक्टरांसह शासनातील आरोग्य विभागांचे अधिकारी-कर्मचारी, महसूल-पोलीस आदी विभागातील कार्यरत असणाऱ्या सर्वांचं मनोबल वाढविणारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विजयकुमार मगर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, डीन डॉ. मस्के यांच्यासह पुरवणीचे संपादक आनंद मोहिनी राम, दैनिक उद्याचा मराठवाडाचे व्यवस्थापकीय संपादक किरण कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

कोरोना विषयी समाजात आजही खूप मोठ्या प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता आहे. ज्यांना विषाणुची बाधा झाली ते आपल्यातलेच घटक आहेत. त्यांच्या समवेत पूर्वी ज्या सद्भावना होत्या तशाच सद्भावना ज्याला कोणाला बाधा झाली असेल त्यांच्याबाबत आपल्या मनात असल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ही सकारात्मक सद्भावना समाजातील प्रत्येक घटकात निर्माण होण्यासाठी नांदेडमधील सर्व माध्यमे निश्चितच चांगला हातभार लावू शकतील, असा विश्वासही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, आमची महसूल, आरोग्य, पोलीस, मनपा आदी सर्व टीम कोरोनाशी लढा देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करीत आहे; पण लॉकडाऊन काहीसे शिथील झाल्यानंतर आता खरी जबाबदारी नांदेडकर नागरिकांची आहे. शासन-प्रशासनाने ज्या सूचना दिल्या आहेत त्या गांभीर्याने पाळणे गरजेचे आहे. सोशल डिस्टन्सिंग, हॅन्डवॉश, सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर व अत्यावश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडणे या सूचना पाळणे नागरिकांची जबाबदारी आहे, तरच आपण कोरोनाशी यशस्वी लढा देऊ शकू, असे त्यांनी स्पष्ट केले. दैनिक उद्याचा मराठवाडाच्या संपादकिय विभागाचे त्यांनी अभिनंदन केले.

दैनिक उद्याचा मराठवाडाने ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने ‘फ्रंटलाईन वॉरियर्स’ ही विशेष पुरवणी प्रकाशित करून आम्हा डॉक्टर मंडळींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आम्हालाही आणखी प्रोत्साहन मिळेल. दैनिक उद्याचा मराठवाडाच्या या लोकोपयोगी पुरवणीचे मी स्वागत करून अभिनंदन करतो, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर म्हणाले.