लोहा तालुक्यात दोन महिलांसह एक पुरुष कोरोना पॉझिटिव्ह; आकडा गेला पाचवर!

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा लोहा

 

लोहा-इमाम लदाफ

दोन दिवसांपूर्वी पाठवण्यात आलेले मात्र प्रलंबित असलेले तीनही अहवाल लोहा आरोग्य विभागाला अखेर प्राप्त झाले असून तीनही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात दोन महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे.

लोहा शहरातील दोन वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयातील दोन महिलांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने लोहा शहर गेल्या तीन दिवसापासून कडकडीत बंद  ठेवण्यात आले आहे. 23 जून रोजी 10 अहवाल पाठविण्यात आले होते. त्यापैकी 9 अहवाल निगेटिव्ह आले तर एक प्रलंबित होता. 24 जून रोजी 11 अहवाल पाठवण्यात आले होते त्यापैकी 9 अहवाल निगेटिव्ह आले होते तर 2 अहवाल प्रलंबित होते.ते तिनही अहवाल आज लोहा आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून ते तीनही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एक चिखलभोसी येथिल एक महिला,चिखलभोसी येथील तरुण तर लोहा शहरातील खंडोबानगर मधील एका महिलेचा समावेश आहे.सदरील महिला सील केलेल्या खाजगी रुग्णालयातील काम करणारी कर्मचारी आहे. या तिनही कोरोना बाधित रुग्णांना नांदेडला हलविण्यात येणार असून तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असल्याची माहिती लोहा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली.यापूर्वीचे दोन महिला कोरोना बाधित रुग्ण असल्याने लोहा तालुक्यातील एकूण आकडा अधिकृतरित्या पाचवर पोहचला आहे.  तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण मुंडे व त्यांची टीम अथक परिश्रम घेत आहे