शेतक-यांची फसवणूक करणाऱ्या कंपनी व विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा – खा.प्रतापराव पाटील चिखलीकर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या राजकारण

प्रभाकर पांडे 

गत दोन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या शेतक-यांना यंदाच्या खरीप पेरणी दरम्यान काही सोयाबीन कंपन्यांनी बनावट बियाणे दिल्यामुळे त्यांची उगवन झाली नसल्याच्या तक्रारी नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे दाखल झाल्यानंतर पेरणीनंतर सोयाबीनची उगवन न झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याच्या सुचना खा.चिखलीकर यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांना दिल्या असून शेतक-यांची फसवणूक करणा-या कंपनी तसेच व्यापारी यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्याची मागणी राज्याच्या कृषी मंत्री यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.

मृगनक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस झाल्याने जिल्हयातील एकूण क्षेत्राफळाच्या 24.39 टक्के जमिनीवर शेतक-यांनी पेरणी केली आहे. दमदार झालेल्या पावसाचा तसेच शेतक-यांची पेरणीची लगबग पाहून सोयाबीनच्या बनावट बियाणे काही कंपनी व व्यापारी यांनी शेतक-यांच्या माथी मारले असून हे बियाणे पेरल्यानंतरही उगवले नसल्याच्या तक्रारी नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे गत १० जूनपासून दाखल झाल्या आहेत. याच तक्रारींच्या अनुषंगाने खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जिल्हयातील काही भागाचा दौरा करत शेतीत न उगवलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली असून अगोदरच संकटात असलेल्या शेतक-यांची सोयाबीन विक्रेत्यांनी केलेली फसवणूक लक्षात आल्यानंतर खा.चिखलीकर यांनी संबंधित कृषि विभागाच्या अधिका-यांना सोयाबीनची उगवन न झालेल्या शेतक-यांच्या शेतीचे पंचनामे करुन शेतक-यांची फसवणूक करणा-या कंपनी मालक व त्याची विक्री करणा-या व्यापा-यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी राज्याचे कृषी मंत्री यांच्याकडे एका पत्राव्दारे केली आहे.