सापडलेली सोन्याची अंगठी केली परत निर्मलाबाई कांबळे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

कंधार ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

प्रतिनिधी, कंधार

जागतिक योगादिनी निर्मलाबाई त्र्यंबक कांबळे या महिलेस ४८ हजार रुपये किंमतीची एका तोळ्याची सोन्याची अंगठी सापडली होती. सापडलेली सोन्याची अंगठी निर्मलाबाई कांबळे यांनी अर्ध्या तासात परत करुन प्रामाणिकपणा दाखवून दिला. या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कंधार तालुक्यातील मौजे चोंडी येथील शिल्पकार सुधाकर ढवळे हे लाठी(खुर्द) येथे आपल्या मेव्हण्याच्या शाल- अंगठीच्या कार्यक्रमासाठी जात होते. जागतिक योगादिनी रविवारी २१ जून रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास महाराणा प्रताप चौक येथे त्यांनी आंब्याची खरेदी केली. त्यानंतर ते दुचाकीवरून लाठी(खुर्द) कडे निघाले. परंतु खिशातील रुमाल काढताना महाराणा प्रताप चौकात दोन अंगठ्या पैकी एक अंगठी गहाळ झाली. काही वेळानंतर निर्मलाबाई कांबळे यांना रस्त्यांवर एका तोळ्याची सोन्याची अंगठी सापडली. सदरील अंगठी ४८ हजार रुपये किंमतीची आहे. एक अंगठी गहाळ झाल्याचा प्रकार सुधाकर ढवळे यांना अर्ध्या तासानंतर लक्षात आला. त्यानंतर त्यांनी अंगठीचा शोधाशोध सुरू केला. निर्मलाबाई कांबळे यांना एक मुलगा काहीतरी शोधत असल्याचे लक्षात आले. काय शोधत आहेस असे त्या मुलास विचारले. त्या मुलाने अंगठी हरवली असल्याचे सांगितले. त्यानंतर निर्मलाबाई कांबळे यांनी अंगठी मला सापडली असल्याचे सांगून अंगठी परत करून प्रामाणिकपणा दाखवून दिला.

सोमवारी २२ जून रोजी दुपारी २ वाजता सुधाकर ढवळे यांनी निर्मलाबाई कांबळे यांची सहपत्नीक भेट घेऊन कपडेरुपी आहेर भेट दिला. यावेळी त्र्यंबक कांबळे, सचिन कांबळे, वैजनाथ गिरी, भारतबाई वाघमारे, पुजा ढवळे आदींची उपस्थिती होती. निर्मलाबाई कांबळे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.