रोगप्रतिकारक शक्ती वाढवूया कोरोनाला हरवू या … (आज जगात व भारतात कोरोना महामारी ही सर्वत्र पसरत चालली आहे. तिच्या विषयीची जागरुकता निर्माण करणारा हा प्रासंगिक लेख)

इतर लेख मराठवाडा संपादकीय

आज संपूर्ण जग कोरणाच्या महामारीने त्रस्त झाले आहे. या रोगाची लक्षणे कोणती, रोग होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. याविषयी केंद्र व राज्य सरकार, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया,सोशल मीडिया आरोग्य सेतू ॲप द्वारे जनजागृती केली जातआहे. मागील ८० दिवसापासून संपूर्ण लोक घरात बंद होते. आता ते हळुहळु बाहेर पडताना दिसत आहेत. आपण यापूर्वी बरीच काळजी घेतल्यामुळे आपली एवढी प्रचंड लोकसंख्या असताना देखील प्रगत राष्ट्रांच्या मानाने आपल्याकडे या रोगाची लागण कमी प्रमाणात दिसून येते. आता ती वाढताना दिसत आहे.
दुर्दैवाने किंवा निष्काळजीपणामुळे जर या आजाराने आपल्या शरीरावर आक्रमण केलेच तर आपण याच्यावर विजय कसा मिळवु शकतो तर त्याचे उत्तर आहे आपली इम्युनीटी किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवून.आज आपल्या देशात लागण झालेल्या पैकी बरेच रुग्ण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे ते या रोगावर विजय मिळवून घरी परतताना दिसत आहेत. यासाठी मुळात आपले शरीर व मन निरोगी असणे महत्त्वाचे आहे.याबद्दलच या लेखात विचार करणार आहोत.
आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्या देशात प्राचीन काळापासून आरोग्याचे महत्त्व परोपरीने सांगितले गेले आहे.आपण पूर्वी आरोग्याचे महत्त्व विशद करणारी प्रार्थना म्हणत होतो जसे-सर्वे पि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाl एवढेच नाही तर आपण सायंप्रार्थनेत आपल्या मुला-मुलींकडून
शुभम करोति कल्याणम् l
आरोग्यम् धनसंपदा l
शत्रू बुद्धी विनाशाय l
दीपज्योती नमोस्तुते ll
असे म्हणून आरोग्य हीच संपदा मानत होतोत.नंतर
निरामय जीवन शैली lआरोग्याची गुरुकिल्लीll
असेही म्हटले गेले पुढे
देही आरोग्य नांदते lभाग्य नाही या परतेll
असाही विचार मांडला गेला.
सुदृढ शरीरातच सूदृढ मन राहते.
Wealth is gone nothing is gone l
Health is gone something is gone l
But character is gone everything is gone ll
असे म्हणून आपण आरोग्य गमावले तर थोडे फार गमावले असाही विचार मांडला गेला आहे.
एकेठिकाणी एक संत असे म्हणतो की या जगात सर्वात सुखी कोण त्याचे उत्तर तो देतो-
पहला सुख निरोगी काया l
दुसरा सुख घर मे माया ll
तिसरा सुख पुत्र आज्ञाकारीll
चौथा सुखब बचन मे नारी ll
असे सांगून जगात सगळ्यात सुखी कोण तर ज्याची काया म्हणजे शरीर निरोगी आहे तो सुखी असे म्हटले गेले आहे आणि हे एका अर्थाने अगदी बरोबर आहे. आपल्या शरीरातील दाढ जरी दुखायला लागली तरी आपलं मन कुठेच लागत नाही.शरीराच्या छोट्यातल्या छोट्या अवयवाला इजा झाली तरी आपले मन विचलित होते व आपण दुःखी होतो. साखर उत्पादित करणाऱ्या साखर कारखान्याच्या अध्यक्षाला जर साखरेचा रोग असेल तर साखर खाता येत नाही हे दुःख आहे ना? आपल्या आयुष्यात रोग हे अशांती व पीडा घेऊन येतात. रोग कोणताही असो तो आपल्या शरीराला लागलेली वाळवी असते.आपण म्हणतो की अज्ञान, अविवेक,अविद्या, गरिबी हे माणसाचे शत्रू आहेत पण याबरोबर माणसाचा मोठा शत्रू हा त्याच्या शरीरात प्रवेश केलेला रोग आहे.जो त्याला त्याने ठरविलेल्या ध्येयाप्रत जाऊ देत नाही.त्याने प्राप्त करावयाचा पुरुषार्थ प्राप्त करू देत नाही. आपण आरोग्य बिघडल्यावर ते सुधारण्यासाठी प्रयत्न करतो पण खरे तर आरोग्यच बिघडणार नाही.यासाठी जागरुकता ठेवून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आपण पहिल्यांदा आरोग्य म्हणजे काय हे जाणून घेऊ. आरोग्याची व्याख्या अशी केली जाते की शारीरिक, मानसिक,सामाजिक दृष्टीने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजे आरोग्य होय.
जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या दिली आहे ती अशी की ‘आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक मानसिक ,सामाजिक आणि आध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे.
आरोग्याची व्याख्या व आरोग्य निर्माण करण्यासाठी काय केले पाहिजे याचे उत्तर इंग्रजीत आरोग्याला जो HEALTH शब्द वापरला जातो त्याच्या प्रत्येक वर्णानुसार विग्रह करून अर्थ काढला तर मिळतो.जसे-
H- Habit-सवय Health या शब्दात पहिले वर्णाक्षर H आलेले आहे. त्यापासून हॅबिट हा शब्द बनलाय त्याचा अर्थ आहे सवय. माणसाचा स्वभाव हा सवयीने बनतो आणि सवयही संगतीने लागते. म्हणून आपण संगत ही चांगल्याची केली पाहिजे.चुकीच्या संगतीने काय होते याबद्दल संत तुकारामांचा एक प्रसिद्ध अभंग आहे त्यातील या दोन ओळी अशा आहेत-
ढेकणाच्या संगे हिरा जो भंगलाl
कुसंगे नाडला साधू तैसा ll
हिरा हा जगातील सगळ्यात मौल्यवान. त्याला ऐरणीवर ठेवून कितीही घणाने मारले तरी तो फुटत नाही.पण तो ढेकणाच्या सहवासात आला की स्पर्श होताच नाश पावतो. म्हणजे विरघळतो तसे माणसाचे आहे. आपले हि-या सारखे अमूल्य शरीर निरोगी आहे पण त्याला चुकीच्या लोकांची संगत लागली कि व्यसनाची सवय जडते व हे शरीर लवकरच नाश पावते. आपणास माहिती आहे की कर्णासारख्या पराक्रमी योध्दालाही दुर्योधनाच्या चुकीच्या संगतीमुळे पराभव पत्करावा लागला. एवढेच नाही तर प्राणही गमवावा लागला. म्हणून आपण चुकीची संगत करु नये. निसर्गाने जे नियम घालून दिले आहेत. सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे, वेळेवर व सात्विक आहार सेवन करणे,नियमित व्यायाम करणे या व अशा चांगल्या सवयी लावून घेतल्या तर आपले शरीर व मन निरोगी राहते.
E- Exercise-व्यायाम-HEALTH मधील E- एक्झरसाइज साठी आला असून त्याचा अर्थ आहे व्यायाम. ई पासून एक्झाम हा शब्दही बनतो. म्हणजेच जीवनाची परीक्षा उत्तीर्ण व्हावयाची असेल तर एक्झरसाइज ईज मस्ट असे म्हटले जाते.एका खेड्यातल्या बाईने व्यायामाचे महत्त्व विशद करताना सांगितले होते की एक पट खाणेl दुप्पट पाणी पिणेl तिप्पट चालणे lचौपट हसणे व पाचपट आरोग्यदायी बनने म्हणून आपण वरील नियम पाळले पाहिजेत पण आपण उलटे करतो खातो दुप्पट, पाणी पितो एकपट,चालणे पळणे आता दोन चाकी व चार चाकी गाड्या मुळे बंदच झाले आहे, माणसं हसताना दिसतच नाहीत.लग्नातसुद्धा फोटोग्राफरला म्हणावे लागते थोडे हसा, खरेतर हास्य हे ईश्वराने मानवाला दिलेली मोठी देणगी आहे. त्याचा वापर आपण केला पाहिजे. संशोधनाअंती असे निदर्शनास आले आहे की हास्यामुळे वेदनाशमक असलेले एंड्रोफीन नावाचे रसायन मेंदूत जास्त प्रमाणात स्त्रवते व त्यामुळे वेदना कमी होते आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. हास्य थकलेल्या व थिजलेल्या मनाला उभारी देण्याचे काम करते.
त्याचबरोबर आपण श्वासाचे व्यायाम( प्राणायाम )केले पाहिजेत. कारण ज्याच्यावर कधीच ठेवता येत नाही विश्वासl त्याचे नाव श्वासll असा बिन भरवशाचा श्वास आहे. त्याचा व्यायाम शरीर व मनासाठी महत्त्वाचा आहे. विपश्यना, प्राणायाम यातून हे करता येते.जगातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ मायकेल मिलर सांगतो की आपले हृदय आरोग्यदायी ठेवायचे असेल तर दररोज व्यायाम करा, खाणे पिणे सांभाळा आणि मनमुराद हसत जा. प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे यांनी आपल्या फिरस्ती नावाच्या ग्रंथात स्वतःच्या मुलाचे उदाहरण दिले आहे. ते म्हणतात की माझा चार्वाक नावाचा मुलगा सोळा सतरा वर्षांचा असताना त्याला डायबेटिस झाला गोळ्या सुरू कराव्या लागल्या पण नंतर त्याने व्यायामात सातत्य, आहारावर नियंत्रण, धावणं,पळणं ,जिम सर्व केल्यामुळे डायबेटीस आटोक्यात आला व पुढे औषध घ्यायची ही गरज पडली नाही.एवढे व्यायामाचे महत्त्व आहे. आपला देह जर मंदिर असेल तर व्यायाम ही त्याची प्रार्थना आहे.
A-Attitude-दृष्टिकोन-HEALTH मधील A-एटीट्यूड म्हणजेच दृष्टिकोण यासाठी आला आहे.आपला दृष्टिकोण कसा आहे यावर आपले जीवन घडत असते.उद्या तुम्ही कोण होणार आहात हे आज तुम्ही कोणता दृष्टिकोण ठेवून जगता यावर अवलंबून आहे. अर्धा ग्लास भरलेला आहे म्हणता की अर्धा ग्लास रिकामा आहे म्हणता यावरून जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोण स्पष्ट होतो म्हणून खरेतर अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे यापेक्षाही पुढचा सकारात्मक विचार आपल्याकडे असला पाहिजे आणि तो म्हणजे ग्लास पूर्णपणे भरलेलाच आहे. अर्धा पाण्याने व अर्धा हवेने पण ग्लास भरलेलाच आहे असा संपूर्ण सकारात्मक दृष्टिकोण असणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय आपले मन निरोगी राहणार नाही व शरीरही निरोगी राहणार नाही. थॉमस अल्वा एडिसन चे एक उदाहरण दिले जाते की या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रिकल बल्बचा शोध लावला पण त्यासाठी त्याला दहा हजार वेळा प्रयत्न करावे लागले. तो थकला नाही.प्रत्येक वेळी होय मला शोध लागणार आहे, मी शोधाच्या जवळ आलोय असा सकारात्मक विचार करत राहिल्यामुळे त्याला हा शोध लावता आला.आपणही असाच सकारात्मक दृष्टिकोण ठेवला पाहिजे. असा न दृष्टिकोण विकसित करण्यासाठी आपण नेहमी हे मी करणारच आहे. माझ्या शिवाय दुसरे कोणी करू शकत नाही. असा सतत विचार करत राहा. स्वभावाला औषध नसते असे म्हणण्यापेक्षा स्वभावाला औषध असते असे म्हणा. प्रथम चांगल्या कडे लक्ष द्या.दुसऱ्याचे दुर्गुण बघण्यापेक्षा सद्गुण बघा, नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहा, नक्कीच तुमचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित होईल व मन सकारात्मक बनेल मन सकारात्मक बनल्यास तन सकारात्मक बनायला वेळ लागणार नाही व तुमच्या शरीरात रोग येवु शकणार नाही.
L-Love-प्रेम HEALTH मधील Lहा प्रेम घ्या व प्रेम द्या अस सांगतो. मानवी जीवनात सगळ्यात महत्त्वाचे काय आहे तर प्रेम देणे व प्रेम घेणे. कबीर तर म्हणाले की जगात पंडित कोण? ज्याने पोथ्या मुखोद्गत केल्या तो नव्हे तर ज्याने प्रेम नावाची अडीच अक्षरे आपल्या जीवनात उतरविली तो.
पोथी पढी पढी जग मुआl
पंडित भया न कोय l
ढाई अक्षर प्रेम काl
पढा सो पंडित होय ll
साने गुरुजींनी ही प्रेमाचे महत्त्व विशद करताना सांगितले की ‘खरा तो एकची धर्मl जगाला प्रेम अर्पावेll साने गुरुजींनी तर जगाला प्रेम देणे हाच मानवधर्म महत्त्वाचा मानला. मी नेहमी सांगत असतो की निसर्गाकडे बघा निसर्गात मेघ आम्हाला पाणी देतात, पक्षी आम्हाला गाणी देतात, माती आम्हाला माया देते, वृक्ष आम्हाला छाया देतात, फुल आम्हाला वास देतात,तर वारा आम्हाला श्वास घेतो, तर मग आपण माणूस म्हणून माणसाला प्रेम द्यायला व प्रेम घ्यायला शिकले पाहिजे.
संवादातील शब्दांना प्रेमाचा ओलावा लाभला की जीवनाला एक सुरेल सूर प्राप्त होतो. मंगेश पाडगावकर देखील म्हणाले की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे पण असे जीवनावर व जगण्यावर आपण प्रेम करतो का ?उत्तर मिळते नाही कारण आपण जर जन्मावर व जगण्यावर प्रेम केले असते तर व्यसनं केली नसती. आत्महत्या केल्या नसत्या म्हणून आपण खरे तर जगण्यावर व जीवनावर प्रेम केले पाहिजे.
‌माणसाने माणसावर प्रेम करावेच परंतु प्राण्यांवर वनस्पतींवर सुद्धा म्हणजेच निसर्गावर सुद्धा आपण प्रेम केले पाहिजे. आपण प्राण्यावर प्रेम केल्यावर प्राणीसुद्धा आपल्यावर प्रेम करतात. महाराणा प्रतापांवर चेतक नावाच्या घोड्याने प्रेम केले. छत्रपती शिवराय, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या कुत्र्यावर प्रेम केलं तर पाळलेल्या कुत्र्यांनी सूध्दा मालकांवर प्रेम केले. डॉ. आमटे हेमलकसा येथे मुक्या पशुपक्ष्यांवर प्रेम करतात तर ते प्राणीही डॉक्टर पती-पत्नीवर जीवापाड प्रेम करताना दिसतात. म्हणून जीवनात प्रेम द्यावे व प्रेम घ्यावे. माणसाला जिंकण्याचे सर्वात मोठे शस्त्र हे प्रेमच आहे.शस्त्रापेक्षा प्रेम बदल घडवून आणू शकते म्हणून प्रेमाच्या मार्गाचा अवलंब करून वागा म्हणजे आपले मन आनंदी राहील. समाज आनंदी राहील व पर्यायाने शरीर आनंदी राहील व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.
T-Tension free life-तणावमुक्त जीवन -आपणास शारीरिक व मानसिक आरोग्य प्राप्त करावयाचे असेल तर तणावमुक्त जीवन महत्त्वाचे आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात माणसे तणावाने ग्रस्त झाले आहेत. शरीराचे व मनाचे नैसर्गिक संतुलन बिघडवणारा प्रभाव म्हणजे तान होय. आपण खालील कारणांमुळे ताण घेतो. धावपळ ,आर्थिक अडचणी, जीवघेणी स्पर्धा, नातेसंबंधातील दुरावा,प्रेमाचा अभाव, भविष्याविषयी चिंता ,दोन पिढ्यांमधील भावनिक वैचारिक पातळी वरील वाढती दरी, यामुळे आपणास ताण येतो. ताण दोन प्रकारचा आहे. एक शारीरिक व दुसरा मानसिक. शारीरिक ताण अती परिश्रमामुळे येतो तो विश्रांती घेतल्यास निघून जाईल. पण मानसिक ताण मात्र जात नाही. हा ताण अत्यंत वाईट आहे. तो मनावर वाईट परिणाम करतो. यामुळे रक्तदाब वाढणे, निद्रानाश, डोकेदुखी, डायबिटीस, भूक मंदावणे, अपचन,लैंगिक सुखातील रस निघून जाणे, अर्धांगवायू,घशाला कोरड पडणे, हृदयाची गती वाढणे असे शारीरिक परिणाम घडून येतात तर चिंता, भीती, चिडचिडेपणा, अपराधभाव, विरुद्ध टोकाचे स्वभाव बनणे ,आत्मग्लानी, निर्णय क्षमताढासाळने या प्रकारचे मानसिक परिणाम घडून येतात त्यामुळे ताण घेणे सोडुन दिले पाहिजे. मग आपणास जर तणावमुक्त जीवन बनवायचे असेल तर आपण काय केले पाहिजे याविषयी सांगितले जाते की सकारात्मक बनणे, आवडीच्या गोष्टीत गुंतवून घेणे, निसर्ग पर्यटन ,वास्तवाचा स्वीकार करणे, हसायला शिकणे, स्वतःसाठी जगायला शिकणे, जीवन पद्धतीत बदल करणे, प्रेम देणे व प्रेम घेणे, तटस्थ राहणे या सगळ्यामुळे आपण तणावमुक्त होऊ शकतो हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.यासाठी प्राणायाम, आसन,ध्यान, कल्पना विहार, संगीत,प्रार्थना यांचा आधार घेतल्यास ही आपण तणावमुक्त होऊ शकतो.आपण जर मर्यादेपेक्षा जास्त ताण घेतला तर त्यातून हृदयविकाराचा झटका या अर्धांगवायू सारखे शारीरिक परिणाम लगेच जाणवतील म्हणून तणावमुक्त जीवन जगायला शिकले पाहिजे. अधिक ताण वाढला तर त्यातून नैराश्य, अस्वस्थता आणि अकाली मृत्यू येऊ शकतो.
H-Happy mind-आनंदी मन-HEALTH मधील शेवटचा H हा आनंदी मनासाठी आलेला आहे.आपण हेल्थ मधील पहिले पाच वर्णाक्षर जर जीवनात उतरविले तरी या सूत्रांमुळे आपले मन आपोआप आनंदी बनेल व तन सुदृढ बनेल व आपणास आरोग्य मिळेल.
शेवटी एवढेच म्हणेन की -कष्ट अधिक गरजा कमीl मिळेल आरोग्याची हमीll
आज आपण तन व मनाच्या आरोग्या पेक्षा धनाच्या मागे अधिक लागलो आहोत.धन मिळवण्यासाठी जेवढे प्रयत्न आपण करतो तेवढेच प्रयत्न जर तन व मनाच्या आरोग्यासाठी केले तर रोग आपल्याजवळच येणार नाहीत.
सर्वार्थाने आरोग्यपूर्ण असणारा समाज हा सदैव प्रगतीपथावर राहत असतो आपण आरोग्यदायी असणे हे आपल्या कुटुंब समाज व देशासाठी उपकारक ठरते.
शेवटी आजच्या कोरोनाच्या काळात आपणास या रोगापासून मुक्त व्हावयाचे असेल तर यासाठी एकच उपाय आहे वरील दिलेल्या आरोग्याच्या पाच मंत्रांचा जीवनात अवलंब करणे व रोगप्रतिकारक शक्ती वाढवुन कोरना वर विजय प्राप्त करणे. आपण सर्वजण याकडे गांभीर्याने पहाल अशा अपेक्षेसह हा लेखन-प्रपंच थांबवतो.

प्रा. डॉ. रामकृष्ण बदने
ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर
ता. मुखेड जि. नांदेड
भ्रमणध्वनी-९४२३४३७२१५