मुखेडमधील विद्यार्थी गिरवत आहेत ऑनलाईन शिक्षणाचे धडे तंत्रस्नेही शिक्षक शिवाजी कराळे यांचा उपक्रम

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : संदीप  पिल्लेवाड 

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र दीड महिना अगोदरच शाळांना सुट्या देण्यात आल्या.परिणामी प्राथमिक शाळेतील या वर्षीचा अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही. तसेच विद्यार्थांच्या वार्षिक परीक्षाही घेता आल्या नाहीत.यामुळे अनेक शाळातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडल्यामुळे शिक्षक व पालक वर्गातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.अशातच पुढील शैक्षणिक वर्ष कधी सुरु होईल याबाबतही अनिश्चितता कायम आहे.

या परिस्थितीवर मात करत कें.प्रा.शा. ब्रँच मुखेड येथील तंत्रस्नेही शिक्षक श्री शिवाजी कराळे यांनी “ brcmukhed.blogspot.com ” ही शैक्षणिक ब्लॉगसाईट तयार करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहचून त्यांना आनंददायी पद्धतीने ऑनलाईन टेस्ट सोडवता येतील याची व्यवस्था केली आले. त्यातून मुखेड तालुक्यासह अनेक शाळांमधील विद्यार्थी या ऑनलाईन टेस्ट सोडवण्यात मग्न झाले आहेत.
तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण विभागामार्फत दररोज अभ्यासमाला दिली जात आहे.

त्या अभ्यासमालेतील विविध उपक्रमाची ओळख व्हावी तसेच नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी व सराव करता यावा यासाठी वर्गनिहाय अनेक ऑनलाइन टेस्टची निर्मिती करून त्या विद्यार्थी व पालक यांना सहज उपलब्ध व्हाव्यात म्हणून ‘ brcmukhed.blogspot.com ’ या ब्लॉगची निर्मिती करण्यात आली आहे.अल्पावधीतच असंख्य विद्यार्थ्यांनी या टेस्ट सोडवल्या आहेत.विशेष म्हणजे परीक्षा झाल्यानंतर लगेचच प्राप्त गुण व चुकलेल्या प्रश्नांची उत्तरे कळत असल्याने त्या चुका दुरुस्तीची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होते.याशिवाय इयत्ता व विषयनिहाय अनेक नवनवीन उपक्रमांचा समावेश करून दृक-श्राव्य शैक्षणिक साहित्य एकाच ठिकाणी या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्यासह तालुक्यातील तज्ञ व उपक्रमशील शिक्षकांचा समूह कार्यरत आहे.तसेच आगामी शैक्षणिक वर्षात शाळा सुरु होण्यास विलंब झाल्यास ऑनलाइन शिक्षण सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत.

विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी उत्तम शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा शिक्षणाधिकारी श्री प्रशांत दिग्रसकर,डायटच्या प्राचार्या सौ.जयश्री आठवले, मुखेडचे गटशिक्षणाधिकारी राम भारती, विस्तार अधिकारी बालाजी पाटील,शिवशंकर जंपलवाड,मनीषा बडगिरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून या ब्लॉगचा पुढील काळात असंख्य विद्यार्थी व शिक्षक यांना शैक्षणिक फायदा होईल अशी आशा व्यक्त केली आहे.