मुखेडच्या कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांची परवड ; साधे पाणी,सॅनीटायझर नाही, स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब कोरोना रुग्णास तपासणीसाठी आयुष डॉक्टराची नियुक्ती; कोरोना रुग्णालयाचा भोंगळ कारभार सुरुच ………  २४ तासात सुविधा पुरवा अन्यथा आंदोलन ; शासनाचे दिड कोटी गेले कुठे ?

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड
   
मुखेड शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले आहे. याठिकाणी अस्वच्छता,साधे पाणी,सॅनीटायझर नसल्याने रुग्णांची परवडत होत असल्याने येत्या २४ तासात सुविधा पुरवा अन्यथा “अज्ञात अचानक अनोखे अवघड आंदोलन” करण्यात येईल असा ईशारा कॉग्रेस तालुका सरचिटणिस डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर, तहसिलदार काशिनाथ पाटील व पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांना व्हॉटसअपच्या माध्यमातून दि. २९ रोजी दिलेल्या निवेदनव्दारे दिला आहे.कोव्हिड -१९ अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय परिसरातील कोवीड सेंटर ची अवस्था अत्यंत दयनीय असून येथे स्वच्छता, पाणी आदी प्राथमिक सुविधांसह कसलीच व्यवस्था नाही. मुखेड कोवीड रुग्णालयासाठी दीड कोटी खर्च करुनही एवढा गलथान कारभार कसा ? कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण कसलीही सोय नसणा­ऱ्या  केंद्रात कसे ? या ठिकाणी एक आयुष डॉक्टरची नियुक्ती केली आहे एखाद्या वेळी रुग्ण सिरीयस झाला की त्यास उपजिल्हा रुग्णालयात नेताना ईन्फेक्शन किती होईल ? येथे एकापेक्षा जास्त तज्ञांच्या निगराणीत पॉझिटिव्ह रुग्ण हवे असताना अशा प्रकारे तेथे केवळ एक डॉक्टर व फार्मसिस्ट असतात. अशा गलिच्छ व गैरसोयीच्या ठिकाणी त्यांना प्रशासनाने ठेवले हा अत्यंत निंदनिय प्रकार असल्याचे निवेदनात नमुद केले आहे.

या ठिकाणी ना सेवक, ना स्वीपर, पेशंट, नातेवाईक, डॉक्टर सर्वांना एकच व्दार असुन पंखे-कूलर, विलगीकरण,प्यायला पाणी, स्वच्छता,सँनिटायझेशन नसुन शासनाने दिलेल्या दीड कोटीत ही अवस्था की व्यवस्था ? अथवा निधी हडप केला आहे असा सवाल डॉ. रॅपनवाड यांनी उपस्थित केला आहे.

येत्या चोविस तासात मुखेड कोवीड सेंटर ची अवस्था बदलून सर्वसुविधा देउन वैद्यकीय उपकरणासह किमान एम.बी.बी.एस. तीन तज्ज्ञांची डयुटी लावावी अन्यथा काँग्रेस पक्षाकडून “अज्ञात अचानक अनोखे अवघड आंदोलन” करण्यात येणार असल्याचे डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मुखेड उपजिल्हा रुग्णालयाचा पुन्हा भोंगळ कारभार

येथील उपजिल्हा रुग्णालय भोंगळ कारभारासाठी प्रसिध्द असुन कोरोनाबाबतही हलगर्जीपणा व अधिका­यांचा चालढकलपणा पाहता पुन्हा एकदा रुग्णालयाचा भोंगळ कारभार सुरु असल्याचे दिसुन येते. सत्य प्रसारीत केल्यास येथील वैद्यकिय डॉक्टर  राजीनाम्याची धमकी देत असल्याचेही अनेकदा समोर आले.