जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवा : पालकमंत्री भरणे

इतर बातम्या महाराष्ट्र

 

सोलापूर : रुद्रय्या स्वामी

जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांची माहिती द्यावी. त्यांच्यावर लक्ष ठेवावे, लक्षणे दिसल्यावर त्यांच्यावर उपचार करावे, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केल्या.
कोरोनाच्या प्रार्दुभावावर विचार करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीशी चर्चा केली. या बैठकीत त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलीसांना या सूचना केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागहात ही बैठक झाली. या बैठकीस खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, रणजितसिंह नाईक निंबाळकर, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, विजय देशमुख, भारत भालके, शहाजीबापू पाटील, राजेंद्र राऊत, संजय शिंदे, यशवंत माने, प्रणिती शिंदे, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे आदी उपस्थित होते.

या बैठकीत सर्व खासदार, आमदार यांनी आपल्या समस्या सूचना मांडल्या. यामध्ये आमदार भारत भालके यांनी हमीभाव केंद्र सुरू करा. उजनी धरणातून नदीत पाणी सोडा, अशी मागणी केली. आमदार राजेंद्र राऊत यांनी वैद्यकीय साधन सामग्री तात्काळ मिळावी, अशी मागणी केली. आमदार सुभाष देशमुख यांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील स्वच्छता करण्याची मागणी केली. आमदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील खाजगी दवाखान्यात कोविड पेशंटवर उपचार करण्याची मागणी केली.

सर्व मागण्या ऐकून घेतल्यानंतर वैद्यकीय साधन सामग्री तात्काळ खरेदी करून संबंधित तालुक्यात दिली जावी, अशा सूचना दिल्या. बाहेरून येणाऱ्या लोकांची माहिती द्यावी. त्यांच्यावर लक्ष ठेवावे, लक्षणे दिसल्यावर त्यांच्यावर उपचार करावे, अशा सूचना केल्या. प्रत्येक आमदारांनी आप-आपल्या तालुक्याची आणि महापौरांनी शहराची काळजी घेण्याचे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी केले.

प्रत्येक तालुक्यात थर्मल स्कॅनर आणि पल्स औक्सिमीटर घेण्यात यावे. संशयित रुग्ण आढळल्यास त्याची कसून तिथेच तपासणी करण्यात यावी. त्यास लगेच आयसीएमआरच्या गाईडलाईननुसार कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, पालिका आयुक्त दीपक तावरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते.