शिष्यवृत्तीचे त्वरित वितरण करा ; अन्यथा १ जूनपासून राज्यभरात आंदोलन – – एसएफआय

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : पवन जगडमवार

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटीने शिष्यवृत्तीचे त्वरित वितरण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा १ जूनपासून राज्यातील विविध जिल्ह्यात विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एसएफआयने दिला आहे. याबाबतचे निवेदन ईमेलद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजयजी मुंडे यांना एसएफआयने पाठवले आहे.

एसएफआयने निवेदनात म्हटले आहे की, सध्या जगभरासह देशात आणि राज्यात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन आहे. यामुळे राज्यातील जनतेला भयंकर परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. या संकटावर मात करण्यासाठी सरकार व आरोग्य व्यवस्था संपूर्ण प्रयत्न करत आहेत. या महामारीला आटोक्यात आणण्याचे खूप मोठे आव्हान आपल्या सर्वांसमोर उभे टाकले आहे. या महामारीने अनेक बळी घेतले. लाखो कुटुंबांचे हातातले काम हिरावून घेतले. शेतकरी, शेतमजूर, कामगार व समाजातील अशाच प्रकारची कामे करून आपले कुटुंब चालवणाऱ्यांवर आज अधिकच संकट कोसळले आहे. म्हणून या महामारीने हाहाकार माजवला आहे. याने सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे.

विद्यार्थ्यांवर देखील या महामारीचा वाईट असा परिमाण झालेला आहे. शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी राज्यात, देशात आणि परदेशात अडकून पडले आहेत. काही विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोच करण्यात आलेले आहे. परंतु अजूनही बरेच विद्यार्थी अशाच अडचणीत आहेत. लॉकडाऊनमुळे यंदा थोडे लवकरच शैक्षणिक वर्ष २०१९-२० हे साल संपले आहे. आतापर्यंत राज्यातील सर्वच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळणे अपेक्षित होते. परंतु आजपर्यंत देखील राज्यातील हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. शैक्षणिक वर्षाच्या शेवटपर्यंत शिष्यवृत्ती न मिळणे, ही खूपच निंदाजनक बाब आहे. इतर कर्तव्ये पार पडताना सरकारने शिष्यवृत्ती वितरीत करण्याच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे गंभीर आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने यावर गंभीर विचार करावा. छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या शिष्यवृत्तीला वितरीत करण्यास इतका विलंब होणे. हे ढिसाळ नियोजनाचे लक्षण आहे. याचा एसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटी निषेध करते.

एसएफआयने शिष्यवृत्तीबाबत मागील महिन्यात १८ एप्रिल २०२० रोजी ई-मेलद्वारे मुख्यमंत्री कार्यालय आणि सामाजिक न्याय मंत्री यांना निवेदन पाठवले होते. आज पुन्हा एकदा एसएफआयने निवेदन सादर केले आहे. येत्या ३१ मे पर्यंत राज्यातील सर्व अभ्यासक्रमाच्या व सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे त्वरित वितरण करावे. अन्यथा १ जूनपासून राज्यभरात एसएफआय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडेल. यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी शासन जबाबदार राहील. असे एसएफआयचे राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड व राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.