या सदिच्छा की राजकारण ?- प्रतोद आ.अमर राजुरकर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

नांदेड  – लोकांमध्ये जावून काम करीत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर उपचारासाठी नांदेडमधील एका रूग्णालयात त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना तात्काळ मुंबईला या असा आग्रह धरला. त्यामुळेच त्यांना मुंबईला हलविण्यात आले. यातही काही जणांकडून राजकारण होत आहे. एका बाजूस त्यांना बरे होण्याचे सदिच्छा देताना राजकारण करण्याचा जो काही प्रयोग होत आहे तो अतिशय खालच्या पातळीचे असल्याचे मत विधान परिषदेचे प्रतोद आ. अमरनाथ राजुरकर यांनी व्यक्त केले.
देशात आणि राज्यात जेंव्हा कोरोनाचा प्रसार होत होता. अशावेळी आपला नांदेड जिल्हा हा या रोगापासून दूर राहिला पाहिजे. यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी अहोरात्र प्रयत्न केले. वारंवार बैठका घेवून प्रशासनास सूचना केल्या. जिल्हा नियोजन समितीच्या उपलब्ध निधीपैकी 33 टक्के निधी हा आरोग्य सेवेसाठी वापरण्यात यावा असा आदेश दिला. नांदेडमधील जुन्या दवाखान्यातील सेवासुविधा वाढविण्यासाठी त्यांनी 2.25 कोटी निधी जिल्हा नियोजन समितीतून तात्काळ उपलब्ध करून दिला. प्रत्येक तालुक्यात कोरोना केअर सेंटरची स्थापना केली. भविष्यात वाढणार्‍या रूग्णांसाठी सेवेत कुठलीही कमी पडू नाही यासाठी औषध उपलब्धता, पीपीई किटची उपलब्धता, मास्क यासोबत अन्य वैद्यकीय साधन सामुग्रीची उपलब्धता अनेकदा तपासून पाहिली.
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्यातील गरीब माणसांना अन्नधान्याची अडचण येवू नये यासाठी घरपोच अन्नधान्य योजना राबविली. दुर्देवाने लोकांमध्ये काम करताना त्यांना कोरोनाची लागन झाली. यामुळे जिल्ह्यातील जनता चिंताक्रांत आहे. लवकरच या आजारातून मुक्त होवून जिल्ह्यातील लोकांच्या समस्यांना सोडविण्यासाठी ते सहभागी होणार आहेत.
अशावेळी एका बाजूस त्यांनी बरे व्हावेत ह्या शुभेच्छा देताना दुसर्‍या बाजूस जिल्ह्यातील वैद्यकीय सेवेवर विश्वास नाही काय? अशा पद्धतीने प्रश्न विचारणे म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होय. ज्यांनी हा आरोप केला त्यांना जिल्ह्यातील जनता चांगलेच ओळखून आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची सुश्रुशा व सेवा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून यावर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे सूक्ष्म लक्ष असल्याचेही आ. राजुरकर यांनी यावेळी सांगीतले.

 

अपडेट राहण्यासाठी खालील पेज लाईक करा

https://www.facebook.com/LokbharatNews/?modal=admin_todo_tour