माझा देव हार माननारा नाही.. आशीर्वादाची मोठी पुण्याई साहेबांच्या पाठीशी… समर्थकांच्या भावना ; सोशल मीडियावर काळजीचे ढग

ठळक घडामोडी नांदेडच्या बातम्या
नांदेड: माजी मुख्यमंत्री तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त वेब माध्यमांसह सोशल मीडियावर पसरल्यानंतर प्रशासन किंवा पालकमंत्री महोदयांच्या अधिकृत सूत्रांकडून कोणताही दुजोरा दिला गेला नाही. परंतु काँग्रेस नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासह भाजप खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर यांनीही ‘साहेब लवकर बरे व्हा..’ चे संदेश सामाजिक माध्यमांमधून जनतेपर्यंत पोहचवले आहेत. त्यामुळे या वृत्ताला काँग्रेससह विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री म्हणून अशोकराव चव्हाण हे  जिल्हा प्रशासनात आघाडीवर राहिले. प्रारंभीच्या काळात दररोज बैठका घेतल्या. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विधान परिषद निवडणूक बिनविरोध होत नसल्याने ते तातडीने मुंबईत गेले. तेथील सर्वपक्षीय चर्चेत सहभागी झाले. त्यामुळे काँग्रेसच्या दुसऱ्या जागेसाठी ताणले गेले नाही आणि निवडणूक बिनविरोध झाली. आठवडाभर मुंबईत थांबलेल्या चव्हाण हे  मंत्रालयातील काही महत्त्वाच्या बैठकीला व मुख्यमंत्र्यांच्या विधानपरिषद सदस्यत्व शपथ कार्यक्रमास हजर राहिले. त्यानंतर पाच सहा दिवसापूर्वी नांदेडला परतले. परंतु त्यांनी जनसंपर्क टाळला. अगदी आमदारांना देखील त्यांनी भेट नाकारली. त्यावरून स्वतःची काळजी घेण्यासाठी त्यांची ही उपाययोजना असावी, असे सर्वांनाच वाटत होते. काही जणांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण रेड झोन असलेल्या मुंबईहून परतले असल्याने त्यांनी स्वतः विलगीकरणाचा मार्ग स्वीकारल्याचे मानले जाऊ लागले.

रविवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने नांदेडच्या खाजगी रुग्णालयात त्यांनी स्वतःची तपासणी केल्याचे सांगितले जाते. त्याच वेळी त्यांच्या घशाचे द्रव नमुने दिले असावेत, असे सांगण्यात येत आहे. सोशल मीडिया आणि वेब मीडिया वरील माहितीनुसार चव्हाण यांचा मुंबईतील वाहन चालक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी तिथे आपल्याही घशाचे नमुने दिले होते. तो पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी नांदेडला येऊन विश्रांती घेतली. परंतु अस्वस्थ वाटत असल्याने पुन्हा स्वब दिला असावा. मुंबईच्या अहवालाचे काय झाले याची कोणतीही बातमी किंवा संदर्भ नांदेडला आजपर्यंत अधिकृतपणे कळालेला नाही.

नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी रविवारी रात्री जारी केलेल्या कोरोना प्रेस नोट मध्ये शिवाजीनगर भागातील ६१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे तसेच एक रूग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे नमूद केले आणि सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. वय, परिसर आणि खाजगी रुग्णालयाच्या संदर्भाने अनेकांचे अंदाज, फोनाफोनी सुरू झाली. दबक्या आवाजात सुरू झालेली चर्चा टिव्हीवर नाव झळकल्याने खात्री न करता अनेक जण एकमेकांना पाठवत होते. त्यातून नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठ्या काळजीचे वातावरण तयार झाले.

समर्थक आणि विरोधक एकमेकांना फोन करून खात्री करू लागले. महत्वाचा दुवा हाती लागला असावा, तेव्हाच काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी फेसबुक व इतर सोशल मीडियावर जाहिराती तयार करून ‘साहेब, लवकर बरे व्हा..’ असे संदेश झळकवले. विरोधकांनीही देखील आपल्या सदिच्छा पाठीशी ठेवल्या. आणि मग जो तो अधिकृतपणे या विषयावर बोलू लागला.

समर्थकांच्या भावना:
कोरोनाविरूद्ध जीव धोक्यात घालून मैदानात उतरलेला योद्धा कोरोनाला हरवून परत येईल. या कठीण काळात आपण नांदेडची काळजी कुटुंब प्रमुख म्हणून घेत होता. जनतेचे आशीर्वाद, शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत. माझा देव हार माननारा नाही. आशीर्वादाची मोठी पुण्याई साहेबांच्या पाठीशी आहे. साहेब लवकरच बरे होऊन येतील.