श्री ष.ब्र.108 सदगुरु निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य गुरुमाऊली नागठाणकर यांची हत्या ; आरोपी फरार

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय
नांदेड : वैजनाथ स्वामी
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात नागठाण या मठामध्ये श्री ष.ब्र.108 सदगुरु निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य गुरुमाऊली नागठाणकर यांची दि 24 रोजी मध्यरात्री हत्या करण्यात आली.
    याबाबत अधिक माहिती मिळाली असता गावातीलच एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला त्यानंतर गळा दाबून महाराजांची हत्या केली.मठातील ऐवज चोरट्याने घेऊन जात असताना महाराजांनी विरोध केला यात चोरट्याने चार्जर ची दोरी घेऊन महाराजांस फाशी देऊन हत्या केल्याचे समजते.
महाराजांच्याच गाडीमध्ये चोरट्याने त्यांचा मृतदेह डिकीत टाकून व   चोरलेल्या अंगठ्या ,सोने इत्यादी ऐवज घेऊन पळून जाण्याच्या बेतात असताना मठाच्या गेट ला गाडीने टक्कर मारली त्यात मोठा आवाज आल्याने
मठातील शिष्यगण जागी झाले व त्यांनी गावातील लोकांना जागे केले तेंव्हा शेजारील लोक जागे झाले म्हणून या आरोपीने चोरलेले दागिने व मृतदेह तसाच गाडीत ठेऊन पळ काढला. महाराजांचा देह रुग्णालयात घेऊन गेले असता त्यांचा देह मृत पावलेला होता.
 ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. लगेच महाराजांचे प्रेत उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून याठिकाणी भाविकांना ही माहिती समजताच एकच खळबळ माजली.
नागठाणा बु.ता. उमरी  येथील ज्या मठामध्ये शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला त्या जवळच  अन्य एक मृतदेह सापडला असून  हा खून ही त्याच व्यक्तीने केला असावा असा समज गावकऱ्यांनी व्यक्त केला .
    घटनास्थळी उमरी  पोलिस रवाना झाले असून याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम चालू आहे.
   या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला असून भाविकांत हळहळ व्यक्त केली जात आहे तर साधूंची हत्या होत असल्याने राज्यात साधू सुरक्षित नाहीत हे यावरून सिद्ध होते. त्यामुळे साधूंच्या सरंक्षण साठी कायदा अमलात आणावा अशी मागणी साधू व भक्तातून होत आहे..
घटनेची पार्श्वभूमी
बालतपस्वी निर्वाणरूद्र पशुपती शिवाचार्यांनी नागठाना गावचा पूर्ण कायापालट करून तेथे विविध सुविधा आणि शासनाच्या योजना कार्यान्वीत केल्या होत्या. त्यामुळे केवळ वीरशैव धर्मातच नव्हे तर या परिसरातील अठरापगड जातीधर्मामध्ये निर्वाणरूद्र पशुपतींना मोठे आदराचे स्थान होते. नुकताच त्यांनी गोशाळेचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी प्रशास्त असे बांधकामही केले. या बरोबरच महाराजांनी मठामध्ये गेल्या काही वर्षापासून अन्नछत्र देखील सुरू केले होते. आरोपी  हा नेहमी मठामध्येच असायचा. अन्नछत्रात नियमितपणे भोजन घ्यायचा. कधी कधी मठामध्येच मुक्कामाला देखील असायचा. आरोपी हा  मुळातच गुंड वृत्तीचा असल्याचे गावातील ग्रामस्थांनी सांगीतले. महाराजांच्या दैनंदिन व्यवहाराचा पूर्ण अभ्यास असलेल्या आरोपीने 
शेवटी आपला डाव साधलाच. शनिवारी मध्यरात्री मठामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने केलेल्या योजनेचा शेवट महाराजांच्या हत्येने झाला. निष्कलंक ब्रम्हचारी, कुशाग्रबुध्दीचा समाजसेवक, शिवसंस्कृतीच्या उपसकाचा अशा दुर्दैवी अंत व्हावा ही घटनाच मुळी मनाला चटका लावून जाणारी आहे. त्यांच्या हत्येने संपूर्ण उमरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.