तब्बल ६० दिवसानंतर लालपरी धावली: १४ बसेसच्या ३० फे-या नागरिंकाना अत्यावश्यक कामासाठी जिल्हा व तालुक्याला जाण्यासाठी झाली सोय

नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड :  संदिप पिल्लेवाड

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात दि.२२ मार्च पासुन चार टप्यात देशात टाळेबंदी सुरु आहे. तब्बल दोन महीन्यानंतर शुक्रवारी दि.२२ रोजी मुखेड ते नांदेड व देगलुर मार्गावर १४ बसेसच्या ३० फे-या सुरु करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावाने देशात मागील दोन महीन्यापासुन लाॅकडाऊन केल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची लालपरी सुध्दा आगारात बंदच होती. लाॅकडाऊन मुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच क्षेत्रातील सर्वकाही थांबले होते. त्यातच गावांना शहरांशी जोडणारी व प्रवाशांच्या सेवेसाठी धावणारी लालपरी सुध्दा ठप्पच होती. दरम्यान शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सुचनांनुसार दि. २२ पासुन जिल्ह्यांतर्गत सेवा सुरु करण्यात आली आहे.
यामध्ये मुखेडहुन नरसी, कोलंबी, कौठा व पेठवडज मार्गे नांदेड. मुखेडहुन हिब्बट, बिल्लाळी, मोटरगा, चोंडी व मुक्रामाबाद मार्गे देगलुर अश्या १४ बसेस सकाळी ७ ते सांयकाळी ७ पर्यंत धावणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली लालपरीची चाके अखेर धावायला सुरुवात झाल्याने लवकरच जनजीवन पुर्वपदावर येईल अशी अपेक्षा जनतेतुन होत आहे.

……..

लालपरीचे निर्जंतुकीकरण करुनच मार्गावर

शुक्रवारी ता.२२ पासुन सुरु करण्यात आलेल्या बसेस महामंडळाच्या वतीने व नगर पालीकेच्या मदतीने निर्जंतुकीकरण करुनच मार्गस्थ करण्यात आले. बारा तास चालण्या-या या बसेस मध्ये केवळ २२ प्रवाशांनाच प्रवास करता येईल व यात सात वर्षाच्या खालील व ६० वर्षांच्या वर वयोमान असणा-या प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. कोरोनामुळे जनतेत भीती असल्यामुळे लालपरीला सध्या अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहीती आगारप्रमुख एस.टी.शिंदे यांनी दिली.