बिलोली, मुखेडचे ‘ते’ बाधित बाहेरचे प्रवासी! – केरूरचा रूग्ण आधी निगेटिव्ह, मग पॉझिटिव्ह

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

नांदेड: शहरात हातपाय पसरून कोरोनाने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडेही वळविला आहे. गुरुवारी आलेल्या सहा पैकी ग्रामीण भागातील तीन बाधित रूग्ण हे मुंबई व हैद्राबाद येथून आल्याचे सांगण्यात येते. बाहेरून आलेले प्रवासी ग्रामीण भागात पॉझिटिव्ह निघत असल्याने गावागावात नागरिकांनी लॉक डाऊन च्या नियमांचे कडक पालन करणे आवश्यक आहे.

मुखेड तालुक्यातील रावनकोळा येथील दोघे कामानिमित्त मुंबईच्या दहिसर भागात वास्तव्यास होते. गावाकडे ते नुकतेच परतले होते. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. घशाचा त्रास आणि ताप दिसून आल्याने मुखेडच्या कोवीड रुग्णालयात दाखल करून त्यांचे स्वब तपासणीसाठी पाठवले असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

बिलोली तालुक्यातील केरुर येथील व्यक्ती हैद्राबाद येथून नांदेडला आला. नांदेडला काही काळ वास्तव्य केल्यानंतर तो ऑटो करून नरसी पर्यंत आला आणि तेथून ट्रकने बिलोलीला आला. लक्षणे दिसून आल्याने तो रुग्णालयात दाखल झाला. त्याचा स्वब तपासणीसाठी पाठवला असता पहिला अहवाल निगेटिव्ह आला. परंतु नांदेडला तो जिथे थांबला तेथील अनेक लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने व लक्षणे सुरू राहिल्याने त्याचा स्वब दुसऱ्यांदा तपासणीसाठी पाठवला तेव्हा अहवाल पॉझिटिव्ह आला.

बारड, भोकर आणि मुखेडच्या कोवीड रुग्णालयात उपचार घेणारा टेंभुर्णी, ता. नायगाव येथील रहिवासी रूग्ण देखील बाहेरून आलेले प्रवासी आहेत. त्यात आणखी तिघांची भर पडली. बाहेरून आलेल्या नागरिकांना गावामध्ये क्वारंटाईन करून ठेवणे आवश्यक आहे. भावनेच्या भरात जाऊन भेटीचा मोह आवरला नाही तर कोरोना संसर्गाचा सह प्रवासी होण्याची वेळ अनेकांवर येऊ शकते. त्यामुळे गाव पुढारी व ग्रामस्थांनी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे.