बँकेत ठेवीच्या नावाखाली शेतकऱ्यांची सर्रास लूट … बँकेने लूट थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन – शिवशंकर पाटील कलंबरकर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

* प्रत्येक  अनुदानाच्यावेळी  शेतकऱ्याकडून  एक हजार  रुपये  वसूल 

* बँकेच्या  तुघलकी  नियमामुळे  शेतकऱ्यांचे  हाल

* कोरोनाच्या  संकटकाळातही बॅंकेला  कीव  येईना

…………………. शेतकऱ्याचा पुळका असलेले बडे नेते घेतात  झोपेचे  सोंग ………….  

मुखेड  : पवन  क्यादरकुंटे 

मुखेड  तालुक्यातील  मुक्रमाबाद येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवीच्या नावाखाली शेतकऱ्यांची सर्रास लूट होत   असून ती तात्काळ थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असे  रयत  क्रांती  संघटनेचे  जिल्हायुवाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी मुक्रमाबाद बॅंकेचे शाखाधिकारी यांना दि  २० रोजी  निवेदन  देऊन  इशारा  दिला .

शासनाकडून गेली तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळ मदत दिली जात आहे. हे पैसे सहकार बँक म्हणून मध्यवर्ती बँकेत जमा केले जातात.मात्र हे मदतीचे पैसे वाटप करतांना शेतकऱ्यांकडून ठेवीच्या नावाखाली प्रत्येकी एक हजार रुपयांची रक्कम कापून घेतली जात आहे. ही दरवर्षी घेतली जाणारी ठेवी ही लूट आहे. हे बंद झाले पाहिजे , शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळाले पाहिजेत अन्यथा तीव्र आंदोलन करू असे  निवेदनात  नमूद  केले .

बँकेच्या नियमानुसार बँक खात्यात एक हजार रुपयांची रक्कम ठेवी म्हणून लागते.ती रक्कम शेतकऱ्यांच्या अनुदानातून एकवेळ कापून घेतली तर काहीही हरकत नाही.मात्र गेली तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून दरवर्षी ठेवीच्या नावाखाली प्रत्येकी एक हजार रुपये  कापून घेतले जात आहेत.दरवर्षी शेतकऱ्यांचे नवीन खाते काढून अनुदान  वाटप केले जाते आणि ते पैसे जमा असलेले खाते वेगळे आहे.यात नवीन एक हजार रुपय जमा करावे लागतील,म्हणून प्रत्येकी दरवर्षी हजार रुपये  ठेवीच्या नावाखाली ठेऊन घेतले जात आहेत.


   ही शेतकऱ्यांची सरळ सरळ केली जाणारी लूट आहे.गेले वर्षी ठेवी जमा असलेल्या खात्यात या वर्षीचे अनुदान जमा करून का वाटप केले जात नाही? ही लूट बंद झाली पाहिजे.शेतकऱ्यांमध्ये याबद्दल तीव्र नाराजी आहे.शेतकऱ्यांना ठेवीच्या पैसे परत मिळाले पाहिजेत.अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही  शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी  दिला यावेळी अनेक  शेतकरी बांधव  उपस्थित होते.