कोरोनाविरोधात राज्य सरकारला जागं करण्यासाठी आजपासून भाजपाचं ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन

ठळक घडामोडी महाराष्ट्र

मुंबई – राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार निष्क्रीय झाले आहे असा आरोप करत राज्यातील महाविकास आघाडीला जागे करून कोरोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने भाजपाचं आजपासून राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.
ऑडिओ ब्रिजद्वारे झालेल्या या बैठकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारी भाजपाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मुख्यमंत्री तसेच राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी व तहसिलदारांना निवेदन देणार आहेत. तर शुक्रवार, दि. २२ रोजी लाखो कार्यकर्ते आपापल्या घराबाहेर हातात फलक घेऊन उभे राहतील व राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करतील. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यानेही हातावर पोट असलेल्यांसाठी स्वतंत्रपणे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी या बैठकीत करण्यात आली आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र व मुंबईत कोरोनाची समस्या हाताबाहेर गेली अशी स्थिती आहे. जबाबदारी घेऊन कोण निर्णय घेत आहे, असा प्रश्न पडतो. राज्यात सर्व काही भगवानभरोसे असल्यासारखी स्थिती आहे. ज्यांना कोरोनाची लागण झाली त्यांना रुग्णालयात प्रवेश मिळून उपचार मिळणे अवघड झाले आहे. गावोगावी अनेक अडचणी आहेत. गरीबांचे, मजूरांचे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. कोणत्याही प्रश्नावर राज्य सरकार ठाम भूमिका घेत नाही. केंद्र सरकारने चिंता करायची आणि राज्याने काहीच करायचे नाही, अशी स्थिती आहे. सत्ताधारी आघाडीकडून केवळ राजकारण करणे, प्रसिद्धी मिळवणे आणि सोशल मिडायावरून आभासी स्थिती निर्माण करणे चालू आहे. वास्तविक स्थिती ध्यानात घेऊन जनतेचे दुःख मांडावे अशी लोकांची अपेक्षा आहे. राजकारण होऊ नये याचा अर्थ जनतेची दुःखे मांडायची नाहीत असे होत नाही. राज्य सरकारच्या नाकर्तेपणावर आसूड ओढून सामान्यांची दुःखे मांडण्याची व त्यांना न्याय मिळवून देण्याची ही वेळ आहे असं ते म्हणाले.
तर राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाच्या फैलावाची स्थिती गंभीर होत गेली आहे. या अभूतपूर्व संकटात राज्य सरकारला सर्वतोपरी साथ देण्यासाठी भाजपाने सरकारवर टीका टाळली होती. पण दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद, सोलापूर इत्यादी ठिकाणची परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याने विरोधी पक्ष म्हणून राज्य सरकारला जागे करण्यासाठी आंदोलनाचा निर्णय पक्षाने घेतला. अशा गंभीर प्रसंगी राज्य सरकारला जाब विचारून काम करण्यास भाग पाडले नाही तर भाजपाने विरोधी पक्ष म्हणून आपले कर्तव्य पार पाडले नाही, असे होईल असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.