धक्कादायक : नांदेडमध्ये आणखी तीन कोरोना बाधित रुग्ण : नांदेडकरासाठी धोक्याची घंटा

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

पंजाबमधून परतलेले तीन ट्रॅव्हल्स चालक कोरोनाग्रस्त!नांदेडमधील बाधीतांची संख्या ६, दोघांचा मृत्यू

नांदेड :  पंजाबला यात्रेकरूंना सोडून परतलेल्या ट्रॅव्हल्सच्या तीन चालकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
गुरुवारी पाठवलेल्या संशयितांच्या स्वॅबपैकी 3 लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दिली.

नवीन तिन्ही रुग्ण पंजाब येथे यात्रेकरूंना सोडून परतलेले नांदेडमधील बसचालक असल्याचे मीडिया समन्वयक व उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले. गुरुवारी त्याच्या स्वबचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. शुक्रवारी सकाळी त्याचा अहवाल आला.

नांदेडमध्ये अडकलेल्या यात्रेकरूंच्या एका तुकडीला पाच दिवसांपूर्वी पंजाबला नेऊन सोडण्यात आले. दहा खाजगी ट्रॅव्हल्सने हे प्रवाशी गेले होते. यासाठी शासनाने परवानगीही दिली होती. राजकीय लोकांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये या यात्रेकरूंना निरोप देण्यात आला.

पंजाब येथून परतल्यानंतर त्या ट्रॅव्हल्स हद्दीबाहेर थांबवून त्यात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. तसेच बसचालकांना तेथूनच थेट संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. तेथे गुरुवारी त्यांचा स्वब घेण्यात आला. शुक्रवारी सकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

नांदेडमधील कोरोना बाधितांची संख्या आता सहावर गेली असून त्यातील नांदेडच्या पीर बु-हाननगर येथील ६४ वर्षीय वृद्ध तसेच सेलू येथील ५५ वर्षीय महिला अशा दोघांचा मृत्यू झाला आहे.

बाधित चारही जण आता पंजाब येथून परतलेले चालक आहेत. अबचलनगर येथील एका चालकाला कोरोनाची बाधा झाल्याने त्याच्यावर पाच दिवसापासून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित तिघांवरही डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 नागरिकांनी घाबरून न जाता आपआपल्या घरात राहून सुरक्षित राहावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे .अफवा पसरू नका अफवांवर विश्वास ठेवू नका असेही सांगण्यात आले