भोकरचे १८ ‘ते’ जण निगेटिव्ह ! निगेटिव्ह अहवालाची संख्या ३६८

नांदेड जिल्हा भोकर

नांदेड : वैजनाथ  स्वामी

 

तेलंगणातील कोरोनाबाधित ट्रक चालकाच्या संपर्कात आलेल्या भोकर येथील १८ जणांच्या घशाचा द्रव तपासणीचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे यांनी या माहितीला दुजोरा दिला.

यासोबतच शुक्रवारी नांदेडहून पाठवलेल्या एकूण ४८ जणांचा अहवालदेखील निगेटिव्ह आल्याची माहिती मीडिया समन्वयक व उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी दिली. त्यामुळे आतापर्यंत निगेटिव्ह आलेल्या अहवालाची संख्या ३६८ वर गेली असून एकही व्यक्ती कोरोना बाधित आढळून आलेला नाही.

भोकर – म्हैसा रस्त्यावरील राहटी तपासणी नाक्यावर १६ एप्रिल रोजी तेलंगणा राज्यातील करीमनगर येथील आंब्याच्या ट्रकसोबत कोरोनाबाधीत चालक आला होता. तपासणीदरम्यान पोलीस प्रशासनाचे आणि परिवहन विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी त्या कोरोनाबाधीताच्या संपर्कात आल्याने शनिवारी १८ जणांची नांदेड येथे तपासणी करून त्यांचा स्वँब औरंगाबाद प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. रविवारी रात्री उशिरा त्या १८ जणांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली. दुसरा अहवाल आल्यानंतर सर्वांना घरी जाण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधीत ट्रकचालकाच्या संपर्कात आलेल्यांचा काय रिपोर्ट येईल याबाबत भोकर तालुक्यातील नागरीकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने चिंताग्रस्तांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.