राज्यातील साखर कारखाने लॉकडाऊन करून ऊसतोड कामगारांना त्यांच्या गावी पोचवा – डॉ डी एल कराड

नांदेड जिल्हा मुखेड

सीटू उसतोड़नी कामगार संघटनेची मुख्यमंत्र्याना निवेदना द्वारे मागणी.

मुखेड : पवन जगडमवार

प्रतिनिधी – राज्यातील साखर कारखाने लॉकडाऊन करा व ऊसतोड कामगारांना त्यांच्या गावी पोचवा अशी मागणी सीटू सलंग्न महाराष्ट्र उसतोड़नी व वाहतूक कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदना द्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात पुढे म्हंटले आहे की,करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु पुणे ,कोल्हापूर , सांगली, जालना अशा काही जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू आहेत.त्यामुळे तेथे ऊसतोड कामगार हजारोच्या संख्येने काम करीत आहेत. कुठल्याही प्रकारची वैयक्तिक सुरक्षा साधने त्यांना पुरविण्यात आलेले नाहीत. वैयक्तिक सुरक्षा साधने नसल्याने हा आजार त्यांना होण्याची जास्त शक्यता आहे. अनेक गावातून आलेले असल्याने या आजाराचा फैलाव राज्य भर होऊ शकतो .

सदर ऊसतोड कामगार कुटुंबे साखर कारखान्यावर येतात व वृद्ध माणसे व त्यांची मुले गावी ठेवलेली असतात. लहान मुले असल्यास आश्रमशाळांमध्ये असतात. परंतु आता शाळा बंद असल्याने हे मुलेही त्यांच्या गावी आलेले आहेत .ज्यांच्या कुटुंबात वडीलधारी मंडळी नाहीत अशा कुटुंबातील मुलांचा प्रश्न गंभीर बनला आहे .ज्यांचे आई-वडील अतिवृद्ध आहेत त्यांची देखभाल करण्याची काही व्यवस्था नाही .तसेच या आजारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत ही ऊसतोड कामगार कुटुंबे त्यांच्या घरी असणे अत्यंत आवश्यक आहे.या सर्व बाबींचा विचार करून साखर कारखाने बंद करणे आवश्यक आहे तसेच या कामगारांना त्यांच्या गावी विशेष परवानगी घेऊन पोहोचवणे आवश्यक आहे. तरी त्यादृष्टीने राज्यातील सर्व साखर कारखाने बंद करण्याचे आदेश द्यावेत व या कामगारांना त्यांचे गावी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच गावी गेल्यानंतर त्यांच्या विलगीकरण ,उपचाराचे व्यवस्था करण्यात यावी. शासनाने याबाबत तातडीनं कारवाई करावी अशी मागणी डॉ कराड यांनी केली आहे.