कोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : वैजनाथ  स्वामी

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपायोजना करण्यासाठी विविध विषयानुसार 31 मार्च 2020 पर्यंत घालण्‍यात आलेले निर्बंध (बंदी) पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 मधील तरतुदीनुसार अधिसुचनेनुसार प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपायोजना करणे आवश्‍यक आहे, त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणून जिल्हाधिकारी यांना घोषित केले आहे. त्यानुसार नांदेड जिल्‍हयातील नमुद विषयनिहाय बाबींवर 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्‍याचे आदेशित करण्‍यात आले आहे. नांदेड जिल्‍हयात फौजदारी संहिता दंडप्रकियेचे कलम 144 अन्‍वये प्रतिबंधात्‍मक आदेश पारीत करण्‍यात आला आहे. पुढील बाबींनुसार 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्‍यात आलेले आदेश पुढील आदेशापर्यंत कायम राहतील.

जिल्ह्यात बंद ठेवण्यात पुढील बाबींचा समावेश आहे. शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्‍था, खाजगी शिकवणी, अभ्‍यासिका केंद्र, शहरी हद्दी लगतच्‍या शैक्षणिक संस्था, जिल्‍हयातील ग्रामीण भागातील सर्व शासकीय व खाजगी शैक्षणिक संस्‍था, महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी अंगणवाडया, चित्रपटगृहे, तरणतलाव, व्‍यायाम शाळा, नाटयगृह, म्‍युझियम, शॉपिंग मॉल, आठवडी बाजार, जिल्‍हयातील ग्रामीण क्षेत्रातील अंगणवाडया, आधार केंद्र, सर्व बॅंकातून अनुदान व पिक विमा वाटप, सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्‍तनोंदणीची काम यांचा या बंदमध्ये समावेश आहे. तर कार्यालयातील बैठकाव अभ्‍यांगतांच्‍या भेटी नियंत्रित राहतील.

यापूर्वी नांदेड जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, निर्देश, परिपत्रके हे या आदेशासह अमंलात राहतील. या आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास संबंधिताविरुध्‍द भारतीय दंडसंहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्‍यात येईल, असेही आदेशात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.