कोरोना व्हायरस : महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 50 ते 75 टक्के कपात

ठळक घडामोडी महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 50 ते 75 टक्केच वेतन कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसशी लढताना आर्थिक अडचणी येऊ नयेत म्हणून महाराष्ट्र सरकारनं तेलंगाणा सरकारच्या पावलावर पाऊल ठेवलाय. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात केलीय.

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधीमंडळाचे सर्व सदस्य, तसंच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करुन त्यांना 40 टक्के वेतन देण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी वेतन कपातीबाबत माहिती दिली.

 

लोकप्रतिनिधींसह राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली आहे. त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे.

‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन मिळेल, तर ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.

राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी दिली.

“कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमुळं राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन आणि कोरोनाविरोधातील लढ्याला नैतिक, आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,” असंही अजित पवार म्हणाले.

“विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे तसेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच राज्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी या निर्णयाला पाठिंबा, सहकार्य देतील,” असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.