क्यू रोना आया है ……………बालाघाटे यांचे ह्रदय स्पर्शी शब्दात

इतर लेख संपादकीय

 

आज संपूर्ण विश्व चीनमधील वुहान या शहरातून आलेल्या व्हायरसने परेशान आहे ते म्हणजे कोरोना-कोविड19 ने..डॉक्टर लोक आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. प्रत्येक माणसाच्या हृदयाची धडधड वाढली आहे..सोबतच आर्थिक घडीही बिघडली आहे. बाहेर निघावं तर लॉकडाऊन,घरात बसावं तर परिस्थिती डाऊन अशी अवस्था झालीय आणि यातूनच वर्षानुवर्षे शहरात कामधंदा शोधण्यासाठी गाव सोडून गेलेल्या, पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेल्या लोकांचे स्थलांतर मनाला चटका लावून जात आहे..स्थलांतराचे मुख्य दोन प्रकार आहेत -आंतरराष्ट्रीय स्थलांतर व देशांतर्गत स्थलांतर . त्यातून अनेक प्रकारचे स्थलांतर झालेले आपल्याला पहावयास मिळते.तसे पाहता जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या 2017 च्या अहवालानुसार 258 दशलक्ष लोक स्थलांतरित आहेत म्हणजेच विश्वाच्या लोकसंख्येच्या 3.4%एवढं हे प्रमाण आहे त्यापैकी आशियाई देशांतील 106 दशलक्ष लोक आहेत या प्रकारात उत्तम उदा म्हणजे सीरिया या देशाचे आहे इ. स.2011 पासून गृहकलहाच्या युद्धातून तेथील 50% लोकांनी आजपर्यंत स्थलांतर केले आहे.या स्थलांतराची कारणे अनेक आहेत यात प्रामुख्याने राजकीय घटक, सांस्कृतिक घटक,सामाजिक घटक, नैसर्गिक आपत्ती, शैक्षणिक व लोकसंख्याशास्त्रीय घटक तसेच आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युगातील आर्थिक घटक कारणीभूत असतात.आता आपण आपल्या देशाची म्हणजेच भारताची बाजू बघूया.. आपला देश हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश म्हणून जगाच्या पटलावर ओळखला जातो व खरा भारत हा खेड्यात आहे असे सांगितले जाते.इ. स.2011 च्या जनगणनेनुसार जवळपास69%लोक ग्रामीण भागात वास्तव्यास होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी तर ‘खेड्याकडे चला’ हा संदेश दिला होता.शेकडो वर्षांपासून स्वयंपूर्ण असलेली खेडी आणि मुख्यतः शेतीवर अवलंबून असलेले लोक आधुनिकीकरणाच्या मृगजळात ओढल्या जाऊन शहराकडे स्थलांतर करताना दिसून आले यातून कुटुंब, शेती, गाव ओस पडून शहरी विळख्यात कंपनी कामगार बनून राहू लागले ,मिळेल ती पडकी कामे करू लागले व आपली तसेच आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवू लागले. पण कोरोना नावाच्या विध्वंसक शक्तीने सर्व मानवजातीला तूर्तास तरी बेचिराख केले आहे.कंपन्या, वाहतूक व्यवस्था, शहरे ठप्प झाली आहेत. अंगात काम करण्याची प्रचंड रग असतानाही नाईलाजाने कामे बंद करावी लागली आहेत जणू काही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ‘स्मशानातील सोनं’ या कथेतील भीमाची खाण बंद पडल्यावर उपासमारीच्या भीतीने होणारी जी तगमग होत होती अगदी तशीच कासावीस होत आहे. काम नाही आणि राहायला हक्काचे घर नाही,आहे ते पण अत्यंत लहान व शहरात होणारा कोरोना रोगाचा फैलाव यामुळे लाखो वंचित, गरीब, भटक्या, मजुरांनी आपल्या गावचा रस्ता धरला पण लॉकडाऊन असल्याने वाहने बंद.गावापर्यंत कसे पोहचावे यातूनच काहींनी सायकल,मोटरसायकल, पायी प्रवास केला ते पण शेकडो कि मी प्रवास करण्याचे धाडस त्यांनी केले. डोक्यावर ओझे, कडेवर लहान लेकरं असा उजडलेला तांडा पाहताना जीवाची घालमेल झाली नसेल तर नवलच.. 2 दिवसाच्या तान्ह्या बाळाला घेऊन 40 कि मी प्रवासास निघालेल्या बहाद्दर मातेचं भयंकर चित्र महाराष्ट्राने बघितले. काहीजण आपल्या मुक्कामी पोहचले पण राज्यांच्या सीमा बंद केल्याने अनेक कामगार लोक परराज्यात अडकले आहेत.यात उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश येथून आलेल्या लोकांची व गाव कुसाबाहेर भीक मागणाऱ्या लोकांची अवस्था अत्यंत दयनीय आहे.यात समाधानाची बाब म्हणजे खाकी वर्दीतील माणसे,काही संस्था, सामाजिक कार्यकर्ते व सरकार त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करत आहे खरोखरंच सलाम करावे असे हे कार्य..केंद्र सरकारने या वर्गासाठी 1.70 लक्ष कोटींचे आर्थिक पॅकेज घोषित केले आहे,अनेक लहान सहान उपाय योजण्याबरोबरच 3 महिन्याच्या राशनची व्यवस्था करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारने सुद्धा या रोगाचा मुकाबला करण्यासाठी डोळ्यात तेल घालून उपाययोजना सुरू केल्या आहेत.पण मुळात गरज आहे हे लोक कामासाठी गावाबाहेर पडलेच कसे?हा विचार करण्याची.शहरात येऊन अगदी पाच दहा हजारांपासून ते 30 हजार वेतनावर हे लोक शरीराचा घाम आणि आणि मनातला आसवांचा पूर गाळत काम करतात.दिवस रात्र राबतात, झोपडपट्टी भागात राहतात.त्यांना गावात राहावंसं वाटत नाही का?गावात काम करावं वाटतं नाही का?आता हा रोग पसरला म्हणूनच त्यांनी गावचा रस्ता धरला का? ही प्रश्न अनुत्तरित राहतील. शहरे गतिमान होत आहेत ,तेथील आर्थिक स्थिती मजबूत होत आहे पण खेड्यांचे काय? हा जर विचार केला तर मन सुन्न होते. आज स्वातंत्र्याच्या 83 वर्षानंतर या लोकांवर ही वेळ का आली?याचा विचार होणे गरजेचे आहे. दिनभर काम की थाली पर पेट खाली अशी अवस्था कायमच घेऊन जगणाऱ्या या वर्गांचा आता कायमचा विचार झाला पाहिजे. त्यांना गावातच काम मिळावं अशी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, शहराबरोबर खेडे पण गतिमान व्हावेत या निमित्ताने हीच अपेक्षा..स्थलांतर को रोकना है तो कुछ करना जरुरी है!

                       देविदास बालाघाटे (एम ए इतिहास-सेट)