कोरोना….निर्णायक क्षण…. डॉ. सचिन खल्लाळ निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांच्या शब्दात

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र

              अमेरिकन मानववंश शात्रज्ञ जेरेड डायमंड यांचं ‘ गन्स,जर्म्स अँड स्टील’ नावाचं पुस्तक वाचल्यानंतर, एक इवलासा विषाणू मानव जातीच्या इतिहासाची दिशा बदलू शकतो ह्या गोष्टीची मोठी गम्मत वाटली होती! त्यावेळी जराही कल्पना नव्हती की लवकरच अशा एका विषाणूचा प्रकोप आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.

COVID १९ ची साथ आता सामाजिक संक्रमणाच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. म्हणजेच आपल्याच अवती भवती असलेल्या एखाद्याकडून हा संसर्ग आता आपल्याला होऊ शकतो. ही मोठी नाजूक अवस्था असते.

‘गर्दी’ हा ज्या समाजाचा स्थायीभाव आहे त्या समाजासाठी ही अवस्था घातक ठरू शकते. म्हणून आपण पाहतोय की सरकार lock down जाहीर करतंय , प्रशासन परोपरीने बजावतंय की घराबाहेर पडू नका, social distancing पाळा… पण ‘नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’ ह्या म्हणीसारखं आपल्यावर मात्र हवा तसा परिणाम होताना दिसत नाही. बहुतेक अजूनही आपल्या मनात असा भ्रम आहे की काही केल्या आपल्याला हा आजार होणार नाही. निव्वळ गम्मत म्हणून मोटारसायकलवर फिरणारी पोरं गावात दिसतंच आहेत, औषधाची चिठ्ठी खिशात ठेवून संचारबंदी बघायला निघालेले हौशे फिरतंच आहेत, सुखासुखी बसलेले ‘आमचे इकडचे नातेवाईक तिकडे जाऊ द्या’ म्हणून पासेस मागणारे उच्चभ्रू प्रशासनाला तगादा लावतंच आहेत …. काहीही करून आपण कसे सिस्टिमच्या वरचे आहोत आणि सामान्यांना लागू असणारी बंधनं आपल्याला कशी लागू होत नाहीत हे दाखवण्याचा काही लोकांना सोस असतो. असे लोकच येत्या काळात आपल्या समाजाचा घात करतील.

इतिहास पाहिला आणि नांदेड पुरतं बोलायचं झालं तर आपल्याकडे कधीच मोठी युद्ध झाली नाहीत, कधीच कुठली सुनामी आली नाही, ज्वालामुखी, भूकंप अशा आपत्ती तर आपल्या लोकांना माहीतच नाहीत. त्यामुळे आपण अजिंक्य आहोत अशी काहीशी बेफिकिरी आपल्या मानसिकतेत रुजली आहे….आणि इथेच हा विषाणू आपल्याला मात देऊन जाईल… आता क्षणभर अशी कल्पना करूया की आपल्या अशा बेफिकिरीमुळे कोरोनाची लागण आपल्याकडे सुरु झालीय. आणि अगदी फार नाही पण केवळ १ टक्का लोक या आजाराने बाधित झाले आहेत. नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या ढोबळ्मानाने ३५ लक्ष गृहीत धरली तरी बाधितांचा हा आकडा ३५००० इतका होतो! आपल्या जिल्ह्यात उपलब्ध असलेले डॉक्टर्स, हॉस्पिटलचे बेड्स, आणि व्हेंटीलेटर्स यांचं साधं त्रैराशिक मांडलं तर दर १८ कोरोना रुग्णांमागे एक डॉक्टर, २० रुग्णांमध्ये मिळून एक बेड आणि ३५००० रुग्णांमध्ये मिळून एक व्हेंटिलेटर अशी विदारक परिस्थिती समोर येते… आणि हे फक्त एक टक्क्यावरच बरं का !

‘घराबाहेर पडू नका’ म्हणून प्रशासनाचा जो कंठशोष चालला आहे त्यामागे हे त्रैराशिक आहे हे आपण लक्षात घ्यायला हवंय. आपली आरोग्य व्यवस्था एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा ताण झेलण्यासाठी निदान आजघडीला तरी सक्षम नाही हे वास्तव आहे. जिथे इटली सारख्या देशाने हात टेकले आहेत तिथे वार्षिक उत्पन्नाच्या (GDP) केवळ १.२८% सार्वजनिक आरोग्यावर खर्च करणाऱ्या आपल्या देशाला ह्या संसर्गाचा विस्फोट झाल्यानंतरची परिस्थिती हाताळणे खूप कठीण जाणार आहे हे सांगायला कुठल्या भविष्यवेत्त्याची गरज नाही.

Prevention is the only cure for us !
संक्रमणाची साखळी तोडणे हाच एकमेव उपाय आहे.

त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करा… प्रशासन म्हणतंय ते निमूटपणे ऐका आणि घरातच बसा.
आपण किती तीसमारखान आहोत हे दाखवण्याची ही वेळ नव्हे . निव्वळ उनाडपणा नियंत्रणात आणण्यासाठी जर आपण प्रशासकीय यंत्रणेची सगळी शक्ती आताच खर्च करणार असू तर उद्या ही यंत्रणा थकल्यावर आपण कुणाकडे बघणार आहोत? ह्या यंत्रणेला कुठलेच बॅक अप नाही हे लक्षात घ्या . There is no second line of defence….

अल्बर्ट कामू ह्या फ्रेंच लेखकाने ‘प्लेग’ नावाच्या त्याच्या पुस्तकात हाताबाहेर गेलेल्या साथीच्या तावडीत सापडलेल्या एका शहराचं वर्णन केलंय. व्यवस्थेचा सगळा कमकुवतपणा आणि मानवी स्वभावाच्या सगळ्या हिंस्र छटा अशा वेळी उजागर होतात. वाचताना अंगावर काटा येतो….
देव करो तशी वेळ न येवो पण तशी वेळ आलीच तर आपत्तीचा मुकाबला करण्याइतपत ऊर्जा प्रशासनात शिल्लक राहील हे बघण्याची जबाबदारी आपली आहे.

डॉक्टर,पोलीस, प्रशासन,पत्रकार आणि जनता हे सगळे घटक सामंजस्याच्या एकाच पातळीवर उभे असतील तरच ह्या आपत्तीचा मुकाबला शक्य आहे .आज ताबा आपल्या हातात आहे. उद्या तो नसेल. ह्या सार्वजनिक आपत्तीचे पर्यावसान सार्वजनिक जल्लोषात करायचे की सार्वजनिक शोकांतिकेत करायचे हा निर्णय उंबरठ्यातून पाऊल बाहेर टाकताना प्रत्येकाने घ्यायचाय…

परीक्षेच्या या घटकेला आपण कसे वागणार आहोत यावर आपलं मूल्यमापन उद्याचं जग करेल. १३५ कोटींचा भारत देश ह्या आपत्तीचा मुकाबला कसा करणार आहे ह्याकडे सगळं जग डोळे लावून आहे. खरी देशभक्ती दाखविण्याची हीच वेळ आहे. स्वयंशिस्तीने वागू तर नक्कीच आपण ही लढाई जिंकू. आणि सगळं माहित असूनही उद्या तसेच वागणार असू तर मात्र आपल्यासारखे करंटे आपणच असू….

निर्णय आपल्या हाती सोपवतो.

                                                   जय हिंद !

                                              डॉ. सचिन खल्लाळ
                                        निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड