स्वारातीम विद्यापीठ व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी द्यावे – कुलगुरु डॉ. उद्धव भोसले

नांदेड नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : वैजनाथ स्वामी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, विद्यापीठ परिसर आणि उपपरिसरातील सर्व शैक्षणिक संकुल, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली आणि कै.श्री उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट येथील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचारी यांनी ‘कोरोना’ (कोव्हीड-१९) विरुधाच्या लढाईसाठी एक दिवसाचे वेतन मदतीच्या स्वरुपात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी द्यावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांनी आज रविवार, दि.२९ मार्च रोजी केले आहे.

पुढे ते म्हणाले, आपला देश आणि राज्य सध्या कोव्हीड-१९ कोरोना व्हायरसच्या अत्यंत गंभीर अशा संकटातून जात आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन कोरोना व्हायरसचा (कोव्हीड-१९) प्रकोप रोखण्याकरिता प्रयत्नशील आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की, आपण आपल्या देशासाठी काहीतरी केले पाहिजे. या भावनेतून आपण सर्वांनी मिळून आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता द्यावे.

विद्यापीठाने सुरुवातीपासूनच स्वच्छतेसंदर्भात विविध उपाय योजना केल्या असून, व्हायरसचा प्रकोप एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीद्वारे पसरू नये म्हणून शासनाच्या निर्देशनानुसार प्राचार्य, प्राध्यापक, संशोधक यांनी आपले घरी राहून (वर्क फ्रॉम होम) विभागाचे कामकाज करावयाचे कळविले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, वारंवार साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुवा, शिंकताना व खोकलतांना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपर धरा, इतरांपासून किमान एक मीटर दूर रहा, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या, फळे भाज्या न धुता खाऊ नका तसेच श्वसन संस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क ठेवतांना संसर्ग न होण्याची काळजी घ्या.