कोरोना : वेदना आणि संवेदना… डॉ. दिलीप पुंडे मुखेड जि.नांदेड

इतर बातम्या इतर लेख ठळक घडामोडी संपादकीय

 

सर्व जनतेस माझा नमस्कार…
गेल्या काही दिवसांपासून जगात कोरोनाने कहर केला असून भारतातही ही साथ वेगाने वाढत आहे. समाजातील प्रत्येक माणूस हा भयभीत झालेला आहे.
देशाचे मा. पंतप्रधान, केंद्रसरकार, मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार, लोकप्रतिनिधी व प्रशासन या साथीला आळा घालण्यासाठी अहोरात्र अथक प्रयत्न करत आहेत. टिव्ही समोर बसल्यानंतर कोरोनाच्या जगभरातील बातम्या पाहिल्या की मन विषण्ण होते अन् चिंता वाढू लागते, कारण कोणाची मुले-ंनातेवाईक हे परदेशात, मुंबई-पुण्यासारख्या महानगरात आहेत. ही अशी परिस्थिती असली तरी धीर खचून जाता कामा नये. आपल्या प्रत्येक भारतीयास या संकटातून बाहेर येणं गरजेचं आहे. कोरोना विषाणूच्या जनजागृतीत अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या. स्वच्छतेचं महत्त्व असेल, वारंवार डोळे, नाक व चेह-याला स्पर्श न करणे, खोकताना-शिंकताना तोंडावर रुमाल धरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, वारंवार हात धुणे, सुट्टीच्या नावाखाली कुठेही न फिरणे, भाज्या धुवून खाणे अन् अर्धवट शिजवलेले किंवा कच्चे मांस न खाणे.
जेष्ठ नागरिक व लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हृदयरोग, मधुमेह इ. आजार असणा-यांनी पण विशेष काळजी घेतली पाहिजे.
मी अफवांवर विश्वास ठेवणार नाही व अफवा पसरवणार नाही, ही पण प्रत्येकाची जबाबदारी आहे. Social media च्या माध्यमातून या विषाणूची सर्वंकष माहिती आपणा सर्वांना झालेली आहे. Social distancing हा यावरचा महत्त्वाचा उपाय असून मा. पंतप्रधानांनी आपला देश LOCK DOWN-Stay At Home केलेला आहे. कोरोना हा विषाणूजन्य आजार असून यावर विश्वासाहार्य असे औषध आजमितीस तरी उपलब्ध नाही. त्यामुळे Prevention is better than cure म्हणजेच प्रतिबंध हाच एक यावरचा उपाय आहे – याची प्रत्येकाला जाणीव होणं गरजेचं आहे. मी स्वतः सुरक्षित राहून माझ्या कुटुंबाला सुरक्षित करणे, समाजाला सुरक्षित करणे पर्यायाने देशाला सुरक्षित करणे हा माझा धर्म आहे, कर्तव्य आहे. भारतीय संविधानाने प्रत्येकाला हक्क दिलेले आहेत तसेच काही कर्तव्येही दिली आहेत. मतदानासारख्या राष्ट्रीय कार्यात बाहेर या म्हणलं तर बरेच जण बाहेर न येता घरातच बसून राहतात. आता सरकार घरात बसा म्हणत आहे तर आपण घराची लक्ष्मणरेषा ओलांडत आहोत. तर या कर्तव्यांना बांधील राहून मा. पंतप्रधान व मा. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या प्रमाणे किमान तीन फुटांचे Social distancing ठेवून मानवीय कर्तव्य पार पाडले पाहिजे. यासाठी मा. जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग, अनेक डॉक्टर्स, इतर वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, मिडीया ,सेवाभावी संस्था तसेच अनेक मंडळी स्वत:चा जीव धोक्यात घालून या संकटाचा सामना करीत आहेत.त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. पण आजमितीला Teach one each one ही संकल्पना राबविणे गरजेचे आहे.
मला जाणीव आहे की तीन आठवडे स्वत:च्या घरात बंदिस्त करून घेणं ही अवघड बाब आहे, माणूस एकाच ठिकाणी असे बसूच शकत नाही, त्यामुळे असे म्हणतात की, if you can’t go outside – go inside म्हणजेच तुम्ही बाहेर जाऊ शकत नसाल तर स्वत:मध्ये जा. आत्मचिंतन, आत्मपरीक्षण, आत्मबदल व आत्मविस्तार या माध्यमातून काहीना काही अंशी बदल होऊ शकतो. बाकी media वर तर अनेक गोष्टी सांगितल्या जातात – वाचन करा, चिंतन मनन करा, विविध उपक्रम करा; हे जरी खरे असले तरी Meditation हा यावरचा खुप मोठा उपाय आहे. ध्यानातून मनाची स्थिरता, एकाग्रता आणि कसल्याही संकटाला सामोरे जाण्यासाठीची शक्ती ही ध्यानधारणेतून माणसाला प्राप्त होऊ शकते.
Few minutes of Meditation will prevent years of Medication – काही मिनिटाचे ध्यान हे काही वर्षाचे औषधे टाळू शकते. – खिन्नतेकडून – प्रसन्नतेकडे जाणे सोपे होईल.
दुसरी गोष्ट आपण शासनाचे सर्व नियम पाळले पाहिजेत. कारण सरळ सरळ संकेत आहे की, कायदे मे रहोगे तो फायदे मे रहोगे… संचारबंदीच्या काळात विनाकारण रोडवर जाणे यातून या आजाराचा संसर्ग वाढण्याची खुप मोठी भीती आहे.
शासनाने शासकीय डॉक्टर व त्यांच्या स्टाफना संरक्षण दिले आहे परंतु अशीच सुरक्षा ही अहोरात्र सेवा देणाऱ्या खाजगी डॉक्टरांना व त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही मिळणे आवश्यक आहे, यातून सर्वांचे मनोधैर्य वाढेल. संकटसमयी अगोदर म्हटलं जायचं की, एकत्र आहात तर मजबूत आहात, सुरक्षित आहात… पण आता असं आहे की, वेगळे आहात तर सुरक्षित आहात. आपण एकत्रच पण थोडे विलग राहून सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे social distancing हा कोरोना व्यवस्थापणातील सर्वात मोठा भाग आहे. आपली लोकसंख्या १३५ कोटी आहे, आपण जर हे बंधन नाही पाळले आणि जर हा कोरोना तिसऱ्या व चौथ्या स्टेज मध्ये गेला तर देशात हाहाकार माजेल, एवढ्यांना आरोग्यसेवा देणे शक्य होणार नाही. त्यामुळे ही साथ पसरणार नाही यासाठी प्रत्येकाने स्वत:ला बांधून स्वत:प्रति कटिबद्ध व्हावं. स्वत: प्रतिज्ञा करावी की, मी कोरोना संकटासाठी शासनाला सदैव सहकार्य करीन व माझ्यावरील बंधनाचे प्रामाणिकपणे पालन करीन, या लक्षामध्ये शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेल्या सूचनांचे पालन करुन मी स्वयंशिस्तीच्या समीधा या आरोग्य यज्ञात टाकेन.
मा. आरोग्यमंत्री म्हणतात की, मीच माझा रक्षक… हे १००% खरं आहे.
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ।- मीच माझा मित्र आहे आणि मीच माझा शत्रू आहे.
सामाजिक स्तरावर मला असे वाटते की, समाजातील लोकप्रतिनिधी, डॉक्टर, प्रतिष्ठित नागरिक व इतर मान्यवरांनी जनजागरण व समुपदेशन करून जनतेचे मनोबल वाढवणे आवश्यक आहे. अशा प्रसंगी अनेक मदतीचे हात पुढे येणे गरजेचे आहे. समाज हा वायदा, फायदा अन् कायदा यावर चालतो… या ठिकाणी वायदाहि करुयात, यातून आरोग्य टिकणार हा फायदा आहे आणि शासन हे कायद्याचं काम करत आहे. प्रत्येकाने काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे गरजेचे आहे.
एका विषाणूनं जात-पात-धर्म-वर्ण यांच्या सगळ्या भिंती स्तब्ध करून सोडल्या आहेत. आता एकच महत्त्वाचं आहे की मानवाचा जीव वाचवणे… या वेदनेच्या संवेदना प्रत्येक भारतीयास असणे आवश्यक आहे.
जगाची ही विषाणू विरूद्धची लढाई भारताला जिंकायची आहे.
एखाद्या मातेला प्रसव वेदना होतात व बाळ जन्माला आल्यानंतर आपण आनंद व्यक्त करतो आणि दुःख विसरतो. आजार आणि त्यातून होणारी आर्थिक व सामाजिक हाणी तीव्र असली तरी Lock down ची वेदना प्रसव वेदनेसारखी आहे, ही वांझ जाणार नाही अन् यातून आरोग्य प्राप्त होईल.
Lock down मध्ये घरात बसून बसून नकारात्मकता, उदासीनता, विषन्नता आलेली असेल तरीही प्रत्येक संकटावर मात करणारा हा आपला भारतीय इतिहास आहे. त्यामुळे डळमळून न जाता प्रत्येकानं यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत. मी तर म्हणतो की, प्रामाणिकपणे जर आपण प्रयत्न केले तर निश्चितच कोरोनाचे हे संकट लवकरात लवकर आपल्या देशांतून नष्ट होईल व यातून अनेक सकारात्मक गोष्टी बाहेर येतील.
तुम्हाला जर यासंबंधीची लक्षणं दिसली तर जवळच्या आरोग्य केंद्रात जावे; साध्या आजारासाठी विनाकारण दवाखान्यात गर्दी करु नये. एखादा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यास त्यांच्याकडं वेगळ्या नजरेने न पाहता त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. पुनश्च एक सामान्य नागरिक म्हणून माझी सर्वांना एकच विनंती की, संकटाला सामोरी जाणारी ही मानवी साखळी social distancing च्याच माध्यमातून निर्माण करणे व या रोगाचा फैलाव होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे वाटते.
सुरू झालेल्या नुतन वर्षाच्या सर्वांना खुप खूप शुभेच्छा…
होऊ देत सुखी सारे, सर्वां आरोग्य लाभू दे |
पाहू देत मांगल्य सारे, न कोणा दुःख होऊ दे…||

(हे माझं वैयक्तिक मत आहे, काही त्रुटी असल्यास क्षमस्व.)

जयहिंद। जय महाराष्ट्र…